वास्तव, देशातील 55 टक्के इंजिनिअर्स बेरोजगार!

Engineer
Engineer

वर्षभरात कॅम्पसच्या माध्यमातून आठ लाख विद्यार्थ्यांपैकी साडेतीन लाख विद्यार्थ्यांनाच मिळाली नोकरी
अकोला - इंजिनिअर होऊन झटपट नोकरी मिळविण्याचं स्वप्न तरुण पाहत आहेत. गतवर्षी देशातील मान्यताप्राप्त इंजिनिअरिंग कॉलेजमधून ७ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी पदवी घेतली आहे. यामधून जवळपास ४५ टक्के म्हणजे तीन लाख ५९ हजार विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या माध्यमातून नोकरी मिळाली तर ५५ टक्के इंजिनिअर्ससमोर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी होऊ लागल्याने इंजिनिअरिंग कॉलेजेस ओस पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त इंजिनिअरिंग कॉलेजेसमधून १९१७-१८ या शैक्षणिक वर्षात सात लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातील तीन लाख ५९ हजार इंजिनिअर्सना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरीचे पत्र मिळाले. काही विद्यार्थी मास्टर्सचे शिक्षण घेत आहेत, तर काहींनी वैयक्तिकरीत्या नोकरी अथवा व्यवसायाकडे वळले असल्याची माहिती नुकतीच संसदीय सत्रातील प्रश्‍नोत्तरातून समोर आली आहे.

काळानुरूप बदलताहेत अभ्यासक्रम
परंपरागत पद्धतीने इंजिनिअरिंगचे शिक्षण देण्याऐवजी कुशल रोजगार निर्माण करणारे शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेटयुक्त, ब्लॉकचेन, रोबोटिक्‍स, क्वाँटम कॉम्युटिंग, डेटा सायन्सेस, सायबर सिक्‍युरिटी, थ्रीडी प्रिंटिंग आणि डिझाइन तसेच व्हर्च्युअल रिॲलिटी यांच्यावर सध्या अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.

इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांची पाठ
इंजिनिअरिंग कॉलेजेस बंद करणे अथवा विद्यार्थी संख्या कमी करणे हा यावर उपाय नसून शासनाने केवळ आयटीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी अन्य क्षेत्रांकडेही लक्ष दिले पाहिजे. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक या शाखांतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसल्याने या शाखांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. 

बरेचदा कॅम्पसमधून सिलेक्‍शन झाले नसले तरी अनेक विद्यार्थी कॅम्पस व्यतिरिक्तही नोकरी मिळवितात. काही विद्यार्थी उच्च शिक्षणाला प्राधान्य देत असतात तर काही विद्यार्थी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे नोकरी मिळविणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमधील आकडेवारीत तफावत दिसू शकते.  
- सतीश देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज, बाभूळगाव, अकोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com