रेल्वेप्रवास ठरतोय जीवघेणा

रेल्वेप्रवास ठरतोय जीवघेणा

नागपूर - स्वस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. परंतु, खचाखच गर्दीमुळे रेल्वेप्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. सव्वा वर्षात केवळ नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतच रेल्वेप्रवासात ५९१ प्रवाशांनी जीव गमावला. याच काळात धावत्या रेल्वेतून पडून तब्बल १४६ जणांचा मृत्यू झाला.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागविलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. रेल्वेगाड्यांमधील गर्दी वाढू लागली आहे. लोकल डब्यांमध्ये तर अगदी कोंबल्याप्रमाणे प्रवासी भरलेले असतात. प्रवासी गेटच्या बाहेर लोंबकाळत असल्याचे चित्र नेहमीच दिसते. या बाबी रेल्वेअपघातांचे प्रमुख कारण आहेत.

२०१८ आणि जानेवरी ते मार्च २०१९ पर्यंतची आकडेवारी बघितल्यास अपरिहार्यता, बेफिकिरी व बेदरकारपणा रेल्वे अपघातमागील प्रमुख कारण असल्याचे लक्षात येते. रेल्वेच्यावरून उच्चदाब वीजवाहिनीचे जाळे असून संपर्कात आल्यास जीव जाईल, याची जाणीव असूनही केवळ  थ्रीलमधून तरुण, युवक रेल्वेच्या छतावर चढतात.

 या धोकादायक पद्धतीने तब्बल ९४ जणांवर जीव गमावण्याची वेळ आली. रेल्वे रूळ ओलांडताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. परंतु, त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून प्रवासी रूळ ओलांडतात. या बेफिकिरीतून ७६ जणांना जीव गमवावा लागला.

धावत्या रेल्वेतून पडून १४६ प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वेप्रवासात कोणतेही अंग बाहेर काढू नका, अशी सूचना वेळोवेळी दिली जाते. यानंतरही प्रवासी दारातून वाकून बघतात. याच बेदरकारपणामुळे पोलला धडकून मृत्यू ओढवतो. सव्वा वर्षात अशाप्रकारे तीन जणांचा बळी  गेला आहे. 

धावत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे धोकादायक आहे. थोडाही तोल गेल्यास फलाटाच्या गॅपमध्ये पडून प्रवाशांचा मृत्यू होतो. रेल्वे व फलाटामधील गॅपमध्ये पडून २८ जणांवर मृत्यू ओढवला आहे. २३ जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केली, तर २२१ प्रवाशांचा नैसर्गिक मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com