सिलिंडर 60 रुपयांनी महाग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नागपूर - नोटाबंदीनंतर केंद्र सरकाराने सिलिंडरच्या दरात तब्बल 60 रुपयांनी वाढ करून सर्वसामान्यांना जबर धक्का दिला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला असून, केंद्राच्या प्रत्येक निर्णयाचे सोशल मीडियावरून जोरदार समर्थन करणाऱ्या मोदी भक्तांनी मात्र यावर चुप्पी साधली आहे.

नागपूर - नोटाबंदीनंतर केंद्र सरकाराने सिलिंडरच्या दरात तब्बल 60 रुपयांनी वाढ करून सर्वसामान्यांना जबर धक्का दिला आहे. यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला असून, केंद्राच्या प्रत्येक निर्णयाचे सोशल मीडियावरून जोरदार समर्थन करणाऱ्या मोदी भक्तांनी मात्र यावर चुप्पी साधली आहे.

एक डिसेंबरपासून ग्रामीण भागात 57 रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 97 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरवाढीने शहरातील ग्राहकांना आता 610 ऐवजी 670 रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांत सात वेळा सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. ज्यांनी त्यापूर्वीच नोंदणी केली होती त्यांना सुधारित बिल पाठविले जात आहे.

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी एजन्सीसोबत संपर्क साधला असताना त्यांनी दरवाढ झाली असल्याने जादाचे पैसे घेत असल्याचे सांगितले. ज्यांनी निर्णयाच्या नोंदणी केली होती, त्यांना जुन्या दराने नोंदणी केली होती. शिवाय बिलाचे एसएमएस पाठविले होते, त्यांना जुन्याच दराने सिलिंडर देण्याची मागणी केली. मात्र, एजन्सीने यास नकार दिला. शासनाच्या आदेशानुसारच आम्ही काम करतो, असे त्यांनी सांगितले.

एजन्सीतर्फे लुबाडणूक
मनीषनगर येथील आर. तिवारी यांनी 29 तारखेला सिलिंडरसाठी नंबर लावला होता. मात्र 31 तारखेला त्यांचा नंबर रद्द करण्यात आला. नव्याने नंबर लावून त्यांना नव्या दराने बिल पाठविण्यात आले. कुंभार टोली येथील उमा मेश्राम यांनी 28 तारखेला नंबर लावला. एक तारखेला त्यांना नव्या दराने बिल पाठविण्यात आले. एकूणच जुने सिलिंडर नव्या दराने विकून एजन्सी ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याचा आरोप ग्राहक कल्याण परिषदेचे देवेंद्र तिवारी यांनी केला. यापूर्वी दोन वर्षांत सातवेळा दरवाढ करण्यात आली. मात्र ग्राहकांना याची माहिती दिली जात नाही. थेट नवे दर आकारल्या जाते. याचा अर्थ आतापर्यंत सातवेळा ग्राहकांची लुबाडणूक झाली असल्याचेही तिवारी म्हणाले. परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे याची तक्रारसुद्धा केली आहे.

Web Title: 60 per cylinder expensive