कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या सत्तर गोवंशाची सुटका

अनिल दंदी
बुधवार, 24 जुलै 2019

चारा, पाणी न देता कत्तलीसाठी उपाशीपोटी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सत्तर गोवंशाची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुटका करून जीवनदान दिले आहे.

बाळापूर (अकोला) : चारा, पाणी न देता कत्तलीसाठी उपाशीपोटी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सत्तर गोवंशाची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुटका करून जीवनदान दिले आहे. काल मंगळवारी मध्यरात्री नंतर हि धडाकेबाज कारवाई केली आहे. यातील आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. 

बाळापूर पोलिसांच्या हद्दीत शहरात सुरू असलेल्या गोवंश कत्तलीबाबतची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक तुषार नेवारे, पोलिस कर्मचारी रफीक शेख, संदीप टाले, अश्विन शिरसाट, अनिल राठोड, प्रमोद डोईफोडे व महीला पोलीस कर्मचारी भाग्यश्री मेसरे यांनी बाळापूर शहरातील एका परीसरात छापा टाकला. त्याठिकाणी आरोपींनी एका छोट्याशा जागेत टिनपत्र्याच्या आवारात चारा, पाणि न देता तब्बल ७० गोवंश निर्दयतेने कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवले होते.

पोलिसांनी पंचनामा करून अंदाजे सात लाख रुपये किंमतीचे गोवंश ताब्यात घेत अकोला येथील आदर्श गोसेवा अनुसंधान केन्द्र येथे हलविली.
दरम्यान पोलीसांची चाहूल लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत तेथून पोबारा केला. बाळापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फरार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 cattle rescued from Slaughterhouse at Akola