जिल्ह्यात मुख्याध्यापकांची 70 टक्के पदे रिक्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मंजूर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण पदांच्या 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. मात्र, उच्च श्रेणी मुख्याध्यापाकांची फेरपदस्थापना प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास अजूनही मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मंजूर उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या एकूण पदांच्या 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. मात्र, उच्च श्रेणी मुख्याध्यापाकांची फेरपदस्थापना प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास अजूनही मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या शाळेची पटसंख्या शंभरपेक्षा अधिक व प्राथमिक शाळेची पटसंख्या 150 पेक्षा अधिक असणाऱ्या शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे पद मंजूर असते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 87 शाळांमध्ये ही पदे मंजूर आहे. परंतु, यापैकी तब्बल 60 पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. काही वर्षांपूर्वी मंजूर पदाच्या उपलब्धतेअभावी अशा अनेक मुख्याध्यापकांना पदावनत केले होते. मात्र, आता मोठ्या संख्येने उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्यामुळे या पदावनत मुख्याध्यापकांनाच त्या पदावर पुनर्पदस्थापना देणे क्रमप्राप्त आहे.
असे असताना अनेक दिवसांपासून ही पदे रिक्त असूनही त्यांना त्याठिकाणी फेरपदस्थापना दिली गेलेली नाहीत. शिक्षक संघटनांकडून याबाबत मागणी रेटल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सदर प्रक्रिया सुरू केली. कालावधी उलटून सदर प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करणे अर्थात या पदावर पुनर्पदस्थापना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मुहूर्तच सापडत नसल्याचे दिसून येते.  
सहायक शिक्षकांचे समायोजन अडले
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व संवर्गाच्या रिक्त अतिरिक्त पदाची समायोजन प्रक्रिया पाच डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या रिक्त पदावर फेरपदस्थापनेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सहायक शिक्षकांची समायोजन प्रक्रियाही थांबली आहे.
 
शिक्षक हिताची कोणतीही प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळेत पूर्ण होत नाही. ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तरी उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची फेरपदस्थापना व शिक्षकांची समायोजन प्रक्रिया त्वरित पार पाडावी.
- सुरेश श्रीखंडे,
जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर.

Web Title: 70% posts of Headmasters in the district vacant