गडचिरोलीत एसआरपीएफमध्ये कोरोनाचा स्फोट...एकाच दिवशी 72 जवानांसह एक व्यक्ती बाधित

मिलिंद उमरे
Saturday, 18 July 2020

शनिवारी कोरोनाबाधित आढळलेले 72 जवान गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होते, तर पॉझिटिव्ह आढळलेला अन्य व्यक्ती हा मुंबईहून आलेला आहे. आजपर्यंतचा कोरोनाबाधितांचा जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा आकडा आहे.

गडचिरोली : राज्य राखीव दलाच्या 72 जवानांसह अन्य एक व्यक्ती शनिवारी (ता. 18) एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आजपर्यंतचा कोरोनाबाधितांचा जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना पॉझिटिव्ह 279 व्यक्तींमध्ये 205 जण पोलिस दलातील आहेत.

शनिवारी कोरोनाबाधित आढळलेले 72 जवान गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होते, तर पॉझिटिव्ह आढळलेला अन्य व्यक्ती हा मुंबईहून आलेला आहे. शनिवारीच देसाईगंज येथील एसआरपीच्या 4 जवानांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 279 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, 113 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.

सध्या 165 सक्रिय रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये पोलिस दलातील जवानांची संख्या सर्वाधिक आहे. सीआरपीएफचे 88, एसआरपीचे 115 व बीआरओचे 2 असे एकूण 205 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हे रुग्ण आता बरेही होऊ लागले आहेत.

"त्या' 66 व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

मुलचेरा येथील मुख्याधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्या संपर्कातील 20 जणांपैकी दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर या तीन लोकांच्या संपर्कातील 66 लोकांचे नमुने पाठविण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. मागील आठवड्यात मुलचेरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने त्यांच्या संपर्कातील 20 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल सकारात्मक मिळाले.

जाणून घ्या - कोरोनाचे होते सावट पण शेतकऱ्यांनी विकला तब्बल 'इतके' लाख क्विंटल चणा..वाचा सविस्तर..

सात दिवस गृहविलगीकरणात

त्यामुळे या तिघांच्या एकूण संपर्कात आलेल्या इतर 66 लोकांचे नमुने तपासणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील सर्व अहवाल नकारात्मक मिळाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच घेतलेल्या खबरदारीमुळे इतरांना संसर्ग होऊ शकला नाही, असे आरोग्य विभागाने कळवले आहे; तरीही या सर्व संपर्कातील व्यक्तींना पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72 jawans were found corona positive in srpf gadchiroli