सव्वा वर्षात रेल्वेतून पडून तब्बल ७२१ प्रवाशांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नागपूर - अवघ्या सव्वा वर्षाच्या काळातच नागपूर जिल्ह्यात तब्बल ७२१ प्रवाशांचा धावत्या रेल्वेगाडीतून पडल्याने मृत्यू झाला. याच काळात रेल्वेगाड्या आणि फलाटांवर आठ हजारांहून अधिक चोरीच्या घटना उघडकीस आल्या. चोरीच्या घटना लोहमार्ग पोलिसांपुढे आव्हान ठरल्या आहेत.

शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत लोहमार्ग पोलिसांकडे केलेल्या अर्जातून ही आकडेवारी पुढे आली आहे. १ जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत लोहमार्ग पोलिस कार्यालयांतर्गत येणाऱ्या ठाण्यांमध्ये एकूण ८ हजार १५१ गुन्हे दाखल झाले. त्यात ८ हजार १४७ चोरीच्या घटनांचा समावेश आहे. गुन्हेगारी घटनांचा छडा लावण्यात लोहमार्ग पोलिसांना फारसे यश येऊ शकले नाही. १५ महिन्यांमध्ये एकूण ९५६ गुन्हे उघडकीस आले. त्यात ९१८ चोरीच्या घटनांचा समावेश आहे. विविध प्रकरणांमध्ये एकूण २४ आरोपींना अटक करण्यात आली. याच कालावधीत एकूण ७२१ प्रवाशांचा गाडीतून पडून मृत्यू झाल्याची नोंद झाली. त्यातील २०१७ या वर्षभरात ५८५ जण मृत्युमुखी पडले, तर चालू वर्षाच्या प्रथम तिमाहीत १३६ जणांच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली.

५१५ किलो गांजा जप्त
सव्वा वर्षात लोहमार्ग पोलिसांनी २७ प्रकरणांमध्ये एकूण ५१५ किलो १२ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त गांजाची किंमत ४४ लाखांच्या घरात आहे. या प्रकरणांमध्ये १८ पुरुष आणि २ महिला असे एकूण २० आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: 721 passenger death Falling out of the train