75 वर्षीय बापाने केला दारुड्या मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

नागपूर : दारुड्या मुलाकडून रोज होणारी मारहाण आणि पैशाच्या मागणीला त्रस्त झालेल्या वृद्ध बापाने झोपेत असलेल्या मुलाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. ही थरारक घटना आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. संजय दामोदर बाळापुरे (वय 40, रा. अलंकारनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दामोदर नागोराव बाळापुरे (वय 75) असे आरोपी पित्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बाळापुरे हा विवाहित होता. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी 12 वर्षांच्या मुलासह मोर्शी येथे आईकडे निघून गेली. वडील या वयातही सुतारकाम करीत संसाराचा गाडा हाकत होते. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे. संजय बेरोजगार होता तसेच दारूचे व्यसनही होते. तो घरातील वस्तू विकत होता, तसेच चोऱ्या आणि दमदाटी करून वस्तीतील लोकांकडून पैसेही उकळत होता. दारू प्यायल्यानंतर वस्तीत वाद घालणे तसेच भांडणे करणे असा उपद्‌व्याप करीत होता. दारू पिऊन घरी आल्यानंतर वृद्ध आईवडिलांना विनाकारण मारहाण करीत होता. त्यामुळे घरातील सर्वजण त्याच्या त्रासाला कंटाळले होते. बुधवारी रात्री अकरा वाजता संजय हा दारू पिऊन घरी आला. त्याने वडिलांशी वाद घातला आणि 25 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, दामोदर यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संजयने वडिलांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या आईलाही मारहाण केली. त्यानंतर तो घरात खाटेवर झोपी गेला. रोजच्या मारहाणीला कंटाळलेल्या दामोदर यांनी घरातील कुऱ्हाड आणली. झोपेत असलेल्या संजयच्या डोक्‍यावर सपासप वार करीत खात्मा केला. ही घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हुडकेश्‍वरचे ठाणेदार संदीप भोसले यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी वृद्धास अटक केली. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 75 year old father killed his son