Vidhan Sabha 2019 : विदर्भात 62 मतदारसंघासाठी 755 उमेदवार रिंगणात

File photo
File photo

नागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये असून 388 उमेदवार पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये आहेत. विद्यमान विधानसभेतील सभागृहाचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विदर्भातून आपले भाग्य आजमावत आहे.
सर्वाधिक बारा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात (शहर 6 व ग्रामीण 6) आहेत; तर, सर्वांत कमी मतदारसंघ भंडारा व वाशीम या दोन जिल्ह्यांमध्ये (प्रत्येकी 3) आहेत. विदर्भातील 62 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी, तर 7 मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. उर्वरित 45 मतदारसंघ खुल्या गटातील उमेदवारांसाठी आहेत. या निवडणुकीत सर्वांत अधिक 20 उमेदवार अमरावती जिल्ह्यातील अमरावती व धामणगाव रेल्वे, तसेच दक्षिण-पश्‍चिम नागपूर या तीन मतदारसंघांत आहेत. सर्वांत कमी चार उमेदवार बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात उभे आहेत.
यंदा सर्व प्रमुख पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. त्यातही भाजप आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उतरलेले सर्वच उमेदवार त्या-त्या पक्षाचे वजनदार नेते आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे.
महायुतीने सर्व मतदारसंघात उमेदवार उभे केले आहे. त्यात 49 उमेदवार भाजपचे, तर शिवसेनेचे 12 व रिपाइं (आठवले) गटाचा 1 उमेदवार आहे. रिपाइंचा उमेदवार भंडारा मतदारसंघात भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहे. महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये कॉंग्रेसचे 45, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 14 व स्वाभिमान शेतकरी संघटना, रिपाइं (कवाडे) गट, स्वाभिमान पार्टी यांचा प्रत्येकी एक उमेदवार यांचा समावेश आहे. अहेरी (जि. गडचिरोली) मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या खात्यात होता. मात्र, येथे कॉंग्रेसनेही उमेदवार टाकल्याने आघाडीतील दोन्ही पक्षांचे उमेदवार येथे रिंगणात आहे.

प्रमुख उमेदवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदारसंघातून यावेळी पुन्हा उभे आहेत. त्यांना भाजपातून कॉंग्रेसमध्ये आलेले आशीष देशमुख यांनी आव्हान दिले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) मतदारसंघात पुन्हा उभे आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेने संदीप गड्डमवार यांना उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त भाजपतर्फे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), डॉ. अनिल बोंडे (मोर्शी), कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे (आर्णी), प्रा. वसंत पुरके (राळेगाव), यशोमती ठाकूर (तिवसा), राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (काटोल), डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा), रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई, प्रहारचे बच्चू कडू, रवी राणा हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com