चार तासांत 77 मिलिमीटर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नागपूर : विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगजर्नसह बरसलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी उपराजधानीला चांगलेच धुऊन काढले. जवळपास तीन-चार तास कोसळलेल्या धो-धो पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. चौका-चौकांमध्ये तलाव साचल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. खोलगट वस्त्या तसेच अपार्टमेंट्‌समध्ये पाणी शिरल्याने तसेच ठिकठिकाणी झाडे पडल्याने अग्निशमन विभागाचीही चांगलीच दमछाक झाली. शहरात जागोजागी सुरू असलेले सिमेंट रोडचे बांधकाम व ते बनविताना पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखीणच भर पडली.
यंदाच्या पावसाळ्यात नागपूरकरांनी पहिल्यांदाच वरुणराजाचा रौद्रावतार अनुभवला. नागपूर वेधशाळेने शनिवारीही विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पुन्हा पावसाचा कहर अपेक्षित आहे. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत तब्बल 77.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या तीव्र प्रभावामुळे हवामान विभागाने विदर्भात तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज आज तंतोतंत खरा ठरला. दुपारी बाराच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हलक्‍या सरी बरसल्यानंतर एक-दीडनंतर वरुणराजाने अचानक "गिअर' बदलविला. जवळपास तास-दीड तास शहरात सगळीकडे धो-धो पाऊस बरसला. बाराला सुरू झालेला पाऊस चारनंतर थांबला. पावसामुळे नाग व पिवळी नदींसह नालेही दुथडी भरून वाहिले. व्हीआयपी रोड, काछीपुरा, सीताबर्डी, शंकरनगर, मेडिकल चौक, नरेंद्रनगर पूल, लोखंडी पूल, मानेवाडा बेसा रोड, प्रतापनगर, खामला, पडोळे चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, गोकुळपेठ, धरमपेठ, हजारीपहाड, काटोल चौक, सदर, संविधान चौक, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, कामठी रोड, इंदोरा, सक्‍करदरा, मानेवाडा चौक, दिघोरी, महाल, इतवारी, नारा-नारीसह हिंगणा, इसासनी, वाडीसह शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये पाणी तुंबले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 77 millimeters in four hours