esakal | स्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची विक्री

बोलून बातमी शोधा

file image
स्वीट मार्टमधून मिठाईऐवजी चक्क तंबाखूजन्य पदार्थांची विक्री
sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : ज्या दुकानात गोड, स्वादिष्ट मिठाई मिळतेय तिथेच कर्करोगासारखे महाभयंकर आजार देणारे तंबाखूजन्य पदार्थ मिळू लागले तर, काय म्हणाल? पण, असे प्रकार जिल्ह्यात घडत असून आरमोरी येथील 'सद्‌गुरू' नावाच्या स्वीट मार्टमधून सुगंधित तंबाखू व सिगारेटचा 78 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरी सुद्धा जिल्ह्यात चोरट्या मार्गाने अवैध सुगंधित तंबाखूची विक्री सुरूच आहे. विशेष म्हणजे आता यात मिठायांची विक्री करणारी दुकानेही सहभाग घेत आहेत. आरमोरी शहरातील सद्‌गुरू दुकानातून आरमोरी नगर परिषद, महसूल विभाग, पोलिस स्टेशन व मुक्तिपथ तालुका चमूने 78 किलो तंबाखू व 1 हजार 200 रुपये किंमतीचे सिगारेट जप्त केले आहे. याप्रकरणी दुकानधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्यासह जिल्ह्यात मिनी लॉकडाउन सुरू आहे.

हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना रुग्णांचा जीव

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे किराणा दुकानातून फक्त खाद्य पदार्थांची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित व मृत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच आहे. आरमोरी शहरातील सद्‌गुरू स्वीट मार्टमधून तंबाखू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे नगर परिषद, महसूल विभाग, पोलिस स्टेशन व मुक्तिपथने संयुक्तरित्या मोहीम राबवीत त्या दुकानाची तपासणी केली. यावेळी दुकानात 78 किलो तंबाखू व 1 हजार 200 रुपयांचा सिगारेटचा साठा आढळून आला. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत दुकानमालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा तंबाखूची विक्री न करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा या दुकानदारावर तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नगर परिषद मुख्याधिकारी हलामे, नायब तहसीलदार राठोड, पोलिस उपनिरीक्षक शिंदे, मुक्तिपथ तालुका संघटक यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - बापरे! प्रश्नपत्रिकेसोबतही मिळतात उत्तरेही, पदव्युत्तर परीक्षा ठरताहेत नावापुरत्या

पवित्र नावाला बट्टा -

या दुकानदाराने आपल्या दुकानाचे सद्‌गुरू असे पवित्र नाव ठेवले. दुकानसुद्धा मिठाईचे आहे. पण, मिठाईच्या नावावर येथे तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू होती. विशेष म्हणजे यापूर्वी कारवाई होऊनही या दुकानदाराने कोणताच बोध घेतला नाही. उलट तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करून सद्‌गुरू या पवित्र नावालाच बट्टा लावला आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा - नागपुरात अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप; मात्र, पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ