नागपुरात आढळले 784 नवे कुष्ठरुग्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नागपूर - देशात कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाल्याचे काही वर्षांपूर्वी जाहीर केले होते. परंतु, पुन्हा एकदा कुष्ठरोगाने डोके वर काढले. गतवर्षी झालेल्या शोधमोहिमेत मोठ्या संख्येने कुष्ठरोगी आढळले. राज्यात नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात 15,695 नवीन रुग्ण आढळले. विशेष म्हणजे विदर्भातील चंद्रपूर जिल्हा यात आघाडीवर आहे. चंद्रपुरात 2015-16 या वर्षात 1,527 रुग्णांची नोंद झाली. यापाठोपाठ "पालघर‘ जिल्ह्यात 1,351 रुग्णांची नोंद झाली. नागपुरात 784 नवीन कुष्ठरुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुष्ठरुग्णांची वाढती संख्या देशासाठी अहितकारक बाब असल्याने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्वचारोग शोधमोहीम हाती घेण्यात आली. देशातील 13 राज्यांतील 163 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. कुष्ठरोगाचे अधिक प्रमाण असलेल्या 16 जिल्ह्यातील 169 तालुक्‍यांमध्ये 14 दिवसांची "त्वचारोग शोधमोहीम‘ 19 सप्टेंबर ते 04 ऑक्‍टोबरदरम्यान राबविली जात आहे. विदर्भातील बुलडाणा व अकोलावगळता उर्वरित 9 जिल्ह्यांत अभियान राबविण्यात येणार आहे.

पाच कोटी नागरिकांपर्यंत पोहोचणार 

पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर त्वचारोग शोधमोहीम राबविली जाणार आहे. राज्यातील 4 कोटी 98 लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 95 लाख 65 हजार घरांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येतील. यासाठी 27 हजार 335 पथक तयार करण्यात आले.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विशेष कुष्ठरोग शोधमोहीम राबविली जाते. आशा-वर्कर, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, नर्सिंग स्कूल, एनसीसी व एनएसएस तसेच बरे झालेले रुग्ण आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कुष्ठरोगाचे सर्वेक्षण केले जाईल. संशयित कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचार दिला जाईल. 

-डॉ. संजीव कांबळे, सहसंचालक (कुष्ठरोग), सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे.

Web Title: 784 new leprosy cases detected in Nagpur