जड वाहनांना आठ तासांचा "ब्रेक' ; आतापर्यंत 86 लाख दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

फुटपाथवर चिल्लर विक्री करणारे, फेरीवाले दुकानदारांनी त्यावर कब्जा केला आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. 

वाडी,(जि. नागपूर) : वाडी, हिंगणा मार्गावर नागरिकांची गर्दी व शाळेच्या विद्यार्थांच्या वेळेच्या कालावधीत शहरातून प्रवेश करून पुढे जाणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीबाहेर थांबवून त्याला अन्य मार्गाने वळविण्याच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. यानुसार अमरावती मार्गे येणाऱ्या वाहनांना आठ तासांचा ब्रेक वडधामना येथे दिला जाणार आहे, अशी माहिती वाडी-एमआयडीसीचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संजय जाधव यांनी दिली. 

अपघातमुक्त मार्ग व शहर बनविण्याच्या दृष्टीने संबंधिताना सहकार्य करण्याची विनंती केली. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या दिशानिर्देशानुसार व "एक पादचारी-सर्वांना भारी' या नीतीप्रमाणे विविध मार्गांलगत असलेले फुटपाथ हे पायी चालणाऱ्यासाठी असतात. त्यावर त्यांचाच अधिकार असतो. परंतु, या फुटपाथवर चिल्लर विक्री करणारे, फेरीवाले दुकानदारांनी त्यावर कब्जा केला आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. 

अपघात होण्याची शक्‍यता

दुकानासमोर वाहणे उभी केली जातात यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. अपघात होण्याची शक्‍यता बळावते. या गंभीर स्थितीचा विचार करून एमआयडीसी वाहतूक विभागाने वाडी ते हिंगणा मार्गावरील फुटपाथवर बसणाऱ्या दुकानदारावर गेल्या आठ दिवसांपासून कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशाप्रकारची मोहीम आता वाडी नाका ते दत्तवाडी, खडगाव रोड व इतर गर्दीच्या मार्गांवर कार्यवाही करण्याचे नियोजन असल्याचे पोलिस निरीक्षक संजय जाधव यांनी सांगितले. 

अशी होणार प्रवेशबंदी

पोलिस आयुक्तालयाच्या 29 मार्चच्या निर्देशानुसार वाडी परिसरातून जड वाहणे जाण्याचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. अमरावती महामार्गावर वडधामना-गोंडखैरीजवळ व लावा-खडगाव मार्गावर लावा येथे विशेष बॅरिकेड्‌स लावून प्रवेशबंदी केली गेली आहे. प्रवेशबंदी नियोजनानुसार सकाळी साडेसहा ते दुपारी बारापर्यंत व दुपारी चार ते रात्री नऊपर्यंत जड वाहणे या क्षेत्रात प्रवेश करणार नाही. 

सहकार्य करण्याचे आवाहन

वाडी-एमआयडीसी पोलिसांकडून 1 जानेवारी ते 4 डिसेंबर 2019 पर्यंत नियमाचे पालन न करणाऱ्या बऱ्याच वाहणावर कार्यवाही करून 45 हजार 230 रुपये चालान कापून 86 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुर्घटनामुक्त वाडी व समाज होण्यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 hour break for heavy vehicles