मानवासाठी किती फायद्याचे आहेत वटवाघुळ? वाचा 

मिलिंद उमरे
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

एखाद्या भयपटात दाखविण्यात येणारे वटवाघुळ अनेकांना घृणास्पद वाटतो. पण, हा निसर्गातील अतिशय गूढ प्राणी आहे. वटवाघुळ उडत असल्यामुळे अनेकांना तो पक्षी आहे, असा समज होतो. पण, वटवाघुळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत वटवाघळांच्या 41 प्रजातींची नोंद झाली असून यातील 8 प्रजाती आयूसीएनच्या संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत आहेत. जगभरात वटवाघळाच्या 1200 प्रकारच्या प्रजाती आढळतात.यांचे वर्गीकरण सर्वसाधारण दोन कुलात करण्यात येते. यातील 200 प्रजाती मेगाकायरोप्टेरा, तर 1000 प्रजाती मायक्रोकायरोप्टेरा कुलात समाविष्ट आहेत. 

गडचिरोली : वनरक्षणासाठी वाघ वाचवा, अशी ओरड नेहमीच होते. जंगलातील देखण्या वाघाला वाचविण्यासाठी सारेच धडपडतात. आपला राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ वाचवायलाच हवा. पण, वड, पिंपळ आणि अनेक वृक्षांची फळे खाऊन आपल्या विष्ठेतून दूरदूरपर्यंत त्याची बीजे पसरवत जंगल उभारणारे, असंख्य कीटकांचा फडशा पाडून मानवजातीचे रक्षण करणारे वाटवाघळे नकोत का वाचवायला, वाघांसाठी सारेजण धडपडतात, पण वटवाघळांसाठी कोण, असा प्रश्‍न आता निसर्ग अभ्यासक विचारत आहेत. 

Image may contain: one or more people, outdoor and nature

वटवाघुळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे 
नेहमी एखाद्या भयपटात दाखविण्यात येणारे वटवाघुळ अनेकांना घृणास्पद वाटतो. पण, हा निसर्गातील अतिशय गूढ प्राणी आहे. वटवाघुळ उडत असल्यामुळे अनेकांना तो पक्षी आहे, असा समज होतो. पण, वटवाघुळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत वटवाघळांच्या 41 प्रजातींची नोंद झाली असून यातील 8 प्रजाती आयूसीएनच्या संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत आहेत. जगभरात वटवाघळाच्या 1200 प्रकारच्या प्रजाती आढळतात.यांचे वर्गीकरण सर्वसाधारण दोन कुलात करण्यात येते. यातील 200 प्रजाती मेगाकायरोप्टेरा, तर 1000 प्रजाती मायक्रोकायरोप्टेरा कुलात समाविष्ट आहेत. 

उपद्रवी प्राणी खाऊन ते माणसांना होणारा त्रास वाचवितात 
एक इंचापासून एक फुट आकारापर्यंतची वटवाघळे असतात. काही वटवाघळे फलाहारी, तर काही कीटकभक्ष्यी असतात. फलाहारी वटवाघळे फळांसोबतच फुलातील मकरंद, परागकणसुद्धा खातात. कीटकभक्ष्यी वटवाघळे डासांसारख्या उपद्रवी कीटकांसह सरडे, बेडूक आणि लहान उंदीरसुद्धा खातात. म्हणूनच त्यांचा मानवजातीसाठी अतिशय उपयोग होतो. डासांसारखे कीटक व उंदरांसारखे उपद्रवी प्राणी खाऊन ते माणसांना होणारा त्रास वाचवितात. यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे या वटवाघळांची अन्ननलिका अतिशय लहान असते. त्यामुळे त्यांनी खाल्लेले अन्नातील जीवनसत्त्व, पोषक तत्त्व झपाट्याने शोषले जाते. अन्न खाताच 20 मिनिटात पचन होऊन विष्ठा बाहेर पडते. त्यामुळे ते वड, पिंपळ, उंबर व इतर अनेक फलाहारी वृक्षांचा बिजप्रसार झपाट्याने करू शकतात. 

No photo description available.

रक्त पिणाऱ्या वटवाघळांची एक दुर्मिळ प्रजाती 
मानवासाठी वटवाघळे अतिशय आवश्‍यक आहेत. वटवाघळांमध्ये रक्त पिणाऱ्या वटवाघळांची एक दुर्मिळ प्रजाती आहे. पण, ती भारतात आढळत नाही. तिला व्हॅम्पायर बॅट म्हणतात. ही प्रजाती आफ्रीकेत आढळते. अशीच दिसणारी एक प्रजाती आपल्या महाराष्ट्रात आहे. पण, ते व्हॅम्पायर बॅटसारखे दिसत असले, तरी फक्त कीटक खातात. म्हणून त्यांना फाल्स व्हॅम्पायर बॅट म्हणजे खोटी रक्तपिपासू वटवाघळे म्हणतात. या गूढ प्राण्याबद्दल संशोधन फार कमी असून त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे. 

हे आहेत दुर्मिळ... 
महाराष्ट्रात आढळणाऱ्या वटवाघळाच्या 41 पैकी 8 प्रजाती दुर्मिळ आहेत. यात रूफस हॉर्स शू बॅट (ऱ्हायनोलोफस रॉउक्‍सी), ब्लिथ्स हॉर्स शू बॅट (ऱ्हायनोलोफस लेपिडस), अंदमान हॉर्स शू बॅट (ऱ्हायनोलोफस कॉग्नॅटस), बर्मिज व्हिस्कर्ड बॅट ( म्योटीस मॉंटीवगस), जावा पिपिस्ट्रिल ( पिपिस्ट्रिलस जावानिकस), टिकेल्स बॅट किंवा व्हिस्पर बॅट ( हेस्पेरोप्टेनस टिकेली), पोमोना राउंडलिफ बॅट (हिप्पोसायडेरस पोमोना), पेंटेड बॅट (केरीव्होउला पिक्‍टा) या प्रजातींचा समावेश आहे. यातील ब्लिथ्स हॉर्स शू बॅट या दुर्मिळ वटवाघळाच्या प्रजातीचा शोध निसर्ग अभ्यासक प्रा. डॉ. गोपाल पालीवाल, डॉ. सुधीर भांडारकर, डॉ. श्‍याम तलमले, अंकुर काळी यांनी नवेगाव बांध अभ्यारण्याजवळच्या प्रतापगड पहाडावर घेतला. झेडएसआयच्या (झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) पुणे येथील प्रयोगशाळेत यावर संशोधन झाले असून या प्रजातीवरचा शोधनिबंध बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, मुंबईच्या शोधपत्रिकेत (रिसर्च जर्नल) नुकताच प्रकाशित झाला आहे. 

वटवाघळांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे 
वटवाघळांची एकूणच जैवविविधतेत महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. दिवसेंदिवस वटवाघळांचे अधिवास कमी होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणून त्यांचे संशोधन व संरक्षण, संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे.
- प्रा. डॉ. गोपाल पालीवाल, निसर्ग अभ्यासक, अर्जुनी (मोरगाव), जि. गोंदिया 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 species of bats in the state in crisis