बॅटरीवरच्या चुलीवर 80 टक्के इंधन बचत

chul
chul

अकोला : चूल...स्वयंपाकासाठी गावाकडे आजही वापरले जाणारे साधन...सहज उपलब्ध होणाऱ्या इंधनाचा वापर चुलीवरील स्वयंपकासाठी होतो...त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष कटाई होते व पर्यावरणाचा ऱ्हासही. त्यावर उपाययोजना म्हणून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील दिवठाणा येथील शेतकऱ्याने पर्यावरण पूरक अशी बॅटरीवरील चूल तयार केली आहे. त्यातून 80 टक्के इंधन बचत होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.


गावाकडे आजही स्वयंपाकासाठी इंधन म्हणून सरपनाचा वापर केला जातो. यात वाळलेले लाकडं आणि तूर व पऱ्हाडीसह पिकांचे अवशेष यांचा समावेश असतो. या सरपनाचा अती वापर केल्यास पर्यावरणासाठी ते घातक ठरणारे आहे. शिवाय धूर अधिक निघत असल्याने गृहिणीच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होतो. मात्र चुलीवरील जेवण अधिक रुचकर व आरोग्यदायी असल्याचा दावा करीत चुलीवरील स्वयंपाकालाच प्रथम पसंती दिली जाते. शहरात मात्र अशा चुलींचा वापर करणे शक्य होत नाही. त्यासाठी दिवठाण्याचे शेतकरी राजेंद्र गोविंद बालसिंगे यांनी तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर बॅटरीवरील चुलीचा शोध लावला आहे. चार्जिंग करून वापरता येणारी ही चूल अवघ्या सहा व्होल्टच्या बॅटरीवर व अतिशय कमी सरपनामध्ये एका कुटुंबाचा स्वयंपाक तयार करण्यासाठी पुरेशी आहे. या चुलीवर 80 टक्केपर्यंत कमी इंधन लागते. सोबतच राखही कमी तयार होते. प्रदूषणालाही कोणताच धोका नाही. मातीच्या घरासोबतच काँक्रिटच्या घरातील महागड्या गॅस ओट्यावरही ही चूल सहज वापरता येण्यासारखी आहे. त्यामुळे चुलीवरील भाकरी खाण्याची इच्छा असणाऱ्या खवय्यांसाठी या शेगडीचा उपयोग फायदेशीर ठरणारा आहे.


तीन वर्ष संशोधन
बॅटरीवर चालणाऱ्या चुलीवर सलग तीन वर्षे संशोधन केले. त्यानंतर ही चूल बाजारात आणली. इंधन बचत आणि पर्यावरण पुरक असलेल्या या चुलीवर पोषण आहार मिळू शकेल, असा दावा राजेंद्र बालसिंगे यांनी केला आहे. ही एक शेगडी 2800 रुपयांना ते उपलब्ध करून देत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी-पुण्यस्‍मरण सोहळ्यात त्यांनी खास नागरिकांच्या अवलोकनार्थ ही बॅटरीवरील चूल ठेवली होती.


फिरत्या दुकानातून प्रचार
पर्यावरण पुरक शेगडीचा वापर नागरिकांनी करावा यासाठी ते गावोगावी फिरत्या दुकानातून प्रचार करीत आहेत. त्यासोबतच ते नैसर्गिक कुंकू, मच्छरदानी आणि पायदाने, बूट तयार करून विकतात. शेतीसाठी पुरक व्यवसाय म्हणून त्यांनी हा यशस्वी प्रयोग करून दाखविला आहे.


डुकरांच्या बंदोबस्तासाठी लढा
वन्य प्राण्यांपैकी वाघ, हरणं यांच्यापासून शेतकऱ्यांना धोका असला तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक धोका हा रानटी डुकरांपासून आहे. वाघ हा काही नेहमी हल्ला करीत नाही. हरणांपासून पिकाला धोका असला तरी जिविताला धोका नाही. रानटी डुकरं मात्र पिकांचे नुकसान करण्यासोबतच शेतकरी, शेतमजूर महिलांवर दररोज हल्ले करतात. त्यामुळे डुकरांचा बंदोबस्त वनविभागाने करावा किंवा शेतकऱ्यांना तरी ते मारण्याची परवानगी द्यावी, यासाठी राजेंद्र बालसिंगे लढा देत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com