80 हजार मुलींना स्वयंसिद्धा करणार ः पालकमंत्री बोंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

अमरावती : अर्पिता ठाकरे या महाविद्यालयीन युवतीच्या खुनाच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 80 हजार शालेय व महाविद्यालयीन मुलींना स्वयंसिद्धा केले जाईल. यासाठीच्या प्रशिक्षणाला सोमवारपासून (ता.29) सुरुवात होईल, अशी माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

मुलींच्या छेडखानीच्या घटना घडू नये यासाठी मुलींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम राबविला जाईल. शहर आणि जिल्ह्यातील 15 केंद्रांवर 29 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक शाळेतील दोन मुली व एक क्रीडा शिक्षक मिळून 2250 मुलींना तालुकास्तरावर प्रशिक्षण देतील. त्यासाठी 31 निपुण प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाईल. शाळास्तरावर 8 ते 13 ऑगस्ट या कालावधीत कराटे, लाठीकाठी चालविणे, ऍरोबिक्‍स व मार्शल आर्ट प्रशिक्षण दिले जाईल. वर्ग आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना पहिल्या टप्प्यात यात सहभागी करून घेतले जाईल. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी विभागीय क्रीडा संकुल येथे शहरातील पाच हजार मुलींचे एकत्रित प्रात्यक्षिक तसेच तालुकास्तरावर दोन हजार याप्रमाणे 14 तालुक्‍यांत 28 हजार मुली प्रात्यक्षिकात सहभागी होतील. मुलींच्या मनगटात सामना करण्याची ताकद निर्माण व्हावी, त्यांना स्वरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, याकरिता हा उपक्रम राबविला जात असल्याचे पालकमंत्री म्हणाले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे मॉनिटरिंग जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री करतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80,000 girls will be strong : Guardian Minister Bonde