शेतकऱ्यांचे 82 कोटी थकले!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • अकोट-पातूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळी मदतीच्या प्रतीक्षेत
  • मागील वर्षीची दुष्काळी मदत बाकी
  • अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत 
  • शेतकऱी मारत आहेत शासकीय कार्यालयाच्या चकरा

अकोला : सरकारी काम अन् वर्षभर थांब या उक्तीचा फटका अकोट, पातूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना बसत आहे. सदर दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्‍यांना वर्षभरानंतर सुद्धा अद्याप 2018 च्या खरीप हंगामातील दुष्काळी मदत न मिळाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परंतु वर्षभरानंतर सुद्धा शासनाने 82 कोटी 7 लाख 11 हजार 172 रुपये शेतकऱ्यांच्या पदरात टाकले नसल्याने या वर्षी अतिवृष्टीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

सन 2018 च्या खरीप हंगामात जिल्ह्यामधील अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी या तालुक्यांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्यामुळे शासनाने संबंधित तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता. त्यासोबतच संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 199 कोटी 11 लाख रुपयांची दुष्काळी मदत सुद्धा जाहीर केली होती. सदर मदत पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा सुद्धा करण्यात आली आहे. असे असल्यानंतर सुद्धा दुष्काळाची परिसिमा ठरवताना शासनाने गत वर्षी सुरुवातीला अकोट व पातूर तालुक्यावर अन्याय केला होता. परंतु नंतर त्यामध्ये सुधारणा करत संबंधित दोन्ही तालुक्यातील सर्व गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता व शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता निधीअंतर्गत (एनडीआरएफ) मदत सुद्धा जाहीर केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित दोन्ही तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 82 कोटी 7 लाख 11 हजार 172 रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. परंतु शासनाने अद्याप शेतकऱ्यांना मदत दिली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी रोष वाढत आहे.

असे आहे बाधित क्षेत्र
दुष्काळी स्थितीमुळे अकोट व पातूर तालुक्यातील 1 लाख 3 हजार 126 हेक्टर कोरडवाहू क्षेत्र बाधित झाले होते. त्यासाठी 70 कोटी 12 लाख 57 हजार 412 रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
दोन्ही तालुक्यातील 495.6 हेक्टरवरील बागायती क्षेत्र सुद्धा बाधित झाल्यामुळे 66 लाख 90 हजार 600 आणि 6 हजार 264.62 हेक्टरवरील बहुवार्षिक पीक बाधित झाल्यामुळे 11 कोटी 27 लाख 63 हजार 160 रुपयांची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे.

निधी प्राप्त होताच बॅंक खात्यात 
अकोट व पातूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 82 कोटी 7 लाख 11 हजार 172 रुपयांच्या निधीची मागणी यापूर्वीच शासनाकडे करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 82 crore drought relief is pending