अंदाज चुकवत अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत तब्बल 82 टक्के मतदान

सुरेंद्र चापोरकर 
Tuesday, 1 December 2020

शिक्षक मतदार संघातील एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी सायंकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार 29 हजार 534 मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिला शिक्षक मतदारांनी हिरिरीने सहभाग घेतला.

अमरावती ः विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सायंकाळपर्यंत अंदाजे सरासरी 82.91 टक्के मतदान झाले. यासोबतच रिंगणातील सर्व 27 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत सीलबंद झाले असून त्यांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता.3) होणार आहे. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या छायेत सर्व अंदाज चुकवत शिक्षकांनी मतदानात जोरदार सहभाग घेत मतदानाची टक्केवारी वाढविली. त्यामुळे उमेदवारांचे हार्टबीट वाढले आहेत. गतवेळी सरासरी 66 टक्के मतदान झाले होते.

शिक्षक मतदार संघातील एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी सायंकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार 29 हजार 534 मतदारांनी मतदान केले. यामध्ये महिला शिक्षक मतदारांनी हिरिरीने सहभाग घेतला. 9 हजार 562 महिला मतदारांपैकी 7 हजार 669 मतदारांनी मतदान केले होते. त्यांच्या मतदानाची टक्केवारी 80.20 टक्के आहे.

अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव 

सकाळी आठपासून विभागातील 77 मतदान केंद्रांसह बुलडाणा व वाशिम येथे प्रत्येकी एक सहाय्यकारी मतदान केंद्रांवर मतदानास सुरवात झाली. सकाळी 8 ते दहा या पहिल्या टप्प्यात केवळ 10.11 टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ती 25 टक्‍क्‍यांवर गेली. दुपारच्या 12 ते 2 या तिसऱ्या टप्प्यात 46 तर चौथ्या टप्प्यात 68.65 टक्‍क्‍यांवर गेली. अखेरच्या टप्प्यात मतदानाची गती चांगलीच वाढून मतदान संपले त्यावेळी ती 82.91 टक्‍क्‍यांवर पोहोचले.

निवडणुकीच्या रिंगणात 27 उमेदवार आहेत. यामध्ये राजकीय पक्षांनी पहिल्यांदाच सहभाग घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्‍यता असतानाच परंपरागत शिक्षक संघटनांनी देखील चांगलीच कंबर कसली होती. अधिकाधिक मतदान व्हावे यावर सर्वांनीच भर दिल्याने मतदानाच्या टक्केवारी सरासरी 16 टक्‍क्‍यांनी वाढली.

यांचे भाग्य सीलबंद

विद्यमान सदस्य व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे, भाजपचे डॉ. नितीन धांडे यांच्यासह प्रकाश काळबांडे, शेखर भोयर, अनिल काळे, दिलीप निंभोरकर, अभिजित देशमुख, अरविंद तट्टे, अविनाश बोर्डे, आलम तनवीर, संजय आसोले, उपेंद्र पाटील, सतीश काळे, नीलेश गावंडे, महेश डवरे, सूर्यभान दिपंकर, डॉ. प्रवीण विधळे, राजकुमार बोनकिले, डॉ. मुश्‍ताक अहेमद रहेमान शाह, विनोद मेश्राम, मोहम्मद शकील अब्दुल अजीज कुरेशी, शरदचंद्र हिंगे, श्रीकृष्ण ठाकरे, किरण सरनाईक, विकास सावरकर, सुनील पवार व संगीता शिंदे-बोंडे या 27 उमेदवारांचे भाग्य आज सिलबंद झाले आहे.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

विभागातील वाशिम जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे. सर्वांत कमी मतदार असलेल्या या जिल्ह्यात 3,813 पैकी 3,315 मतदारांनी मतदान केले. त्याची सरासरी 86.94 टक्के आहे. तर, सर्वाधिक 10 हजार 386 मतदार असलेल्या अमरावती जिल्ह्याची सरासरी 81.01 टक्के आहे. यवतमाळमध्ये 85.43, अकोला 82.50 व बुलडाणा जिल्ह्यात 81.33 टक्के मतदान झाले.

क्लिक करा - War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय सांगायचे होते 'बाबां'च्या नातीला?

गुरुवारी फैसला

गुरुवारी (ता.3) सकाळी आठ वाजता येथील विलासनगर परिसरातील वेअर हाऊसमध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. 14 टेबलवर एकाच वेळी मत मोजल्या जाणार असून पहिल्या पसंतीचे मत कळायला रात्र उजाडेल असा अंदाज आहे. पहिल्या पसंतीत कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांची गणना केल्या जाणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 82 percent voting in Amravati teachers constituency