नागपूरमध्ये ११ दिवसांमध्ये ९ खून

अनिल कांबळे
गुरुवार, 10 मे 2018

नागपूर - मुख्यमंत्र्यांच्या शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून गेल्या ११ दिवसांत ९ हत्याकांडांनी उपराजधानी हादरली. यापैकी नऊपैकी पाच खून हे गॅंगवॉरमधून झाले आहेत. यात कुख्यात गुंडांचा समावेश आहे.

नागपूर - मुख्यमंत्र्यांच्या शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी तोंड वर काढले असून गेल्या ११ दिवसांत ९ हत्याकांडांनी उपराजधानी हादरली. यापैकी नऊपैकी पाच खून हे गॅंगवॉरमधून झाले आहेत. यात कुख्यात गुंडांचा समावेश आहे.

वाढती गुन्हेगारी पोलिस आयुक्‍तांना आव्हान देत असल्याचे दिसून येते. 
डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी उपराजधानीच्या आयुक्‍तपदाचा कार्यभार स्वीकारताच गुन्हेगारी समूळ उपटून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वेळोवेळी बैठका आणि नियोजनही आखण्यात आले होते. मात्र, आयुक्‍तांनी दिलेल्या सूचना आणि आदेशांना पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी केराची टोपली दाखवत असल्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. पोलिस कर्मचारी ‘उपर भी देना पडता..!’ अशी थाप मारून स्वतःचे खिसे भरत आहेत. त्यामुळे गुन्हेगार खाकीला खिशात ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत. अवैध वाहतूक आणि ऑटोचालकांची गुंडागर्दी ही उपराजधानीची नवीन ओळख निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिस निरीक्षकांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध उघडपणे दिसून येतात. पोलिसच गुन्हेगारांशी ‘कमिशन बेसिस’वर काम करीत असल्याचे नंदनवनमधील हवाला कांडाने उघडकीस आले आहे. असे प्रकार घडत असतील तर गुन्हेगारी नियंत्रित येणे शक्‍य नसल्याचे बोलले जाते. गुंडांच्या टोळ्यांशी ‘चार’ पैशासाठी पोलिस हातमिळवणी करीत असल्यामुळे सद्यःस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे.

‘हरी पत्ती’ मिळत असल्याने गप्प?
महाराष्ट्र पोलिस दलात नागपूर गुन्हे शाखेचे नाव अभिमानाने घेतले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखासुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून सुस्त पडली आहे. शहरात अनेक ठिकाणी दारूचे अड्‌डे, क्रिकेट सट्‌टेबाजी, देहव्यापार, सट्‌टापट्‌टी-जुगार, अवैध देशी दारूविक्री बिनधास्त सुरू आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेकडो अवैध व्यवसाय असताना केळव ‘हरी पत्ती’ मिळत असल्यामुळे पोलिस निरीक्षक वर्ग मूग गिळून गप्प आहे. 

Web Title: 9 murder in 11 days