डॉ. जोशीच ‘निमंत्रणवापसी’चे सूत्रधार

डॉ. जोशीच ‘निमंत्रणवापसी’चे सूत्रधार

यवतमाळ - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भात उद्‌घाटक नयनतारा सहगल यांना निमंत्रण देणे व त्यांचे निमंत्रण रद्द करणे, या सर्व घटनेचे मुख्य सूत्रधार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हेच असल्याचा आरोप निधी संकलन समितीचे प्रमुख पद्माकर मलकापुरे यांनी आज ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे. 

यवतमाळ येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११, १२ व १३ जानेवारीदरम्यान होत आहे. सहगल यांचे नाव ठरविण्याबाबत मलकापूरे म्हणाले की, कार्यक्रम पत्रिका, प्रमुख पाहुणे, अतिथी, विशेष अतिथी आणि मुख्यत्वे उद्‌घाटक ठरविण्यासाठीची बैठक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी झाली होती. त्यात डॉ. जोशी यांनी उद्‌घाटक वगळता निमंत्रितांची सर्व नावे निश्‍चित करून घेतली होती. परंतु, उद्‌घाटकाचे नाव गुलदस्तात ठेवले होते. त्यानंतर ते नागपूरला गेले व त्यांनी दुसऱ्याच दिवशी डॉ. नयनतारा सहगल यांचे नाव निश्‍चित केल्याचा मेल यजमान संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांना पाठविला. 

डॉ. सहगल यांच्या संदर्भात त्यांनी घेतलेल्या निर्णयाला यजमान संस्थेने कधीही विरोधही केला नाही, असे मलकापुरे यांनी सांगितले. दरम्यान, अरुणा ढेरे जंतूसंसर्गाने आजारी आहेत. घसा बसल्याने त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे नयनतारा सहगल प्रकरणात त्या बोलणार नाहीत, असा निरोप त्यांच्या घरून देण्यात आला.

सहगल यांच्या न येण्याने आयोजकांची अडचण दूर झाली असली, तरी प्रतिनिधी शुल्क भरून संमेलनाला आलेल्या रसिकांना त्यांचे विचार जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे त्यांचे भाषण उद्‌घाटन कार्यक्रमात वाचले जावे.
- जयंत पवार, ज्येष्ठ साहित्यिक

संमेलनासाठी कोणाला बोलवायचे हा निर्णय साहित्य महामंडळाचा आहे. त्याचा यजमान आयोजक संस्थांशी कुठलाही संबंध नाही. आतापर्यंत सर्वच निर्णय महामंडळानेच घेतले आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्यावर संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी आहे. 
- मदन येरावार, स्वागताध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन.

सहगल यांना आमचा विरोध नसून, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल तर आक्षेप असायचे कारणच नाही. 
राज ठाकरे, मनसेचे अध्यक्ष

अखिल भारतीय स्तरावरचे साहित्य संमेलन ४५ वर्षांनंतर यवतमाळात होणे ही भूषणावह बाब होती. मात्र, उद्‌घाटक डॉ. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याने वाङ्‌मयीन चळवळीला काळिमा फासला गेला. ‘लग्न’ सरकारने मोडले. आयोजकांनी सहगल यांना बोलू द्यायला पाहिजे होते.
-प्रा. वसंत पुरके, माजी शिक्षणमंत्री

सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा. सुरक्षेच्या मुद्द्यावर हे निमंत्रण रद्द झाल्याचे सांगितले जाते आहे. तसे असेल तर हे राज्य सरकारचे मोठे अपयश आहे. संमेलनाला पुरेशी सुरक्षा देणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. 
-राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com