भामरागड तालुक्‍यात 98 गावे दारूमुक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

भामरागड (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील 103 महसुली गावांपैकी 98 गावांत देशी-विदेशी व गावठी दारूविक्री बंद करण्यात आली आहे. 85 गावांत खर्राविक्री पूर्णपणे बंद असल्याची माहिती मुक्तिपथ संघटनांनी व्यसनमुक्ती संमेलनात दिली.

भामरागड (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील 103 महसुली गावांपैकी 98 गावांत देशी-विदेशी व गावठी दारूविक्री बंद करण्यात आली आहे. 85 गावांत खर्राविक्री पूर्णपणे बंद असल्याची माहिती मुक्तिपथ संघटनांनी व्यसनमुक्ती संमेलनात दिली.
भामरागड येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सभागृहात मुक्तिपथ तालुका कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलन पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंजगावचे पुरस्कृत शेतकरी सीताराम मडावी होते. मुख्य मार्गदर्शक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, ज्येष्ठ आदिवासी नेते हिरामण वरखडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भामरागडचे पोलिस निरीक्षक संदीप भांड, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, जिल्हा मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, नगराध्यक्षा संगीता गाडगे, गटशिक्षणाधिकारी अश्‍विनी सोनवणे आदी उपस्थित होते.
या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी पुरुष व महिला कार्यकर्त्यांशी दारूबंदी व खर्राबंदी या दोन मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधला. ग्रामसभेला असलेले अधिकार व पेसा कायद्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. मोहाची दारू आदिवासी संस्कृतीचा भाग असल्याचा अपप्रचार केला जातो. वास्तविक मोहफुलाला या संस्कृतीत स्थान असेल तर मोह भिजवून त्याचे पाणी पूजेसाठी का वापरले नाही. मग मोहाच्या दारूचा अट्टहास का, असा प्रश्‍न हिरामण वरखडे यांनी उपस्थित केला. दारूव्यतिरिक्त मोहफुलाचे अनेक फायदे असल्याचे त्यांनी सांगितले. दारू व खर्रा आरोग्यासाठी हानिकारक आहे. नागरिकांनी या व्यसनापासून दूर राहावे. दारू व खर्राबंदीसाठी पोलिसांचे मुक्तिपथ टीमला संपूर्ण सहकार्य राहील, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप भांड यांनी केले. ग्रामसभेचा ठराव घेऊन जिंजगावला पूर्णपणे दारू व खर्रा बंद केला. ग्रामसभेने गावागावात ठराव घेऊन दारूबंदी व खर्राबंदी करा, अशी विनंती गोंडी भाषेतून सीताराम मडावी यांनी उपस्थितांना केली.
प्रबोधनातून जनजागृती
व्यसनमुक्त संमेलनात लोकबिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा व जि. प. शाळा कोयनगुडा येथील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर नृत्य व पारंपरिक प्रबोधनपर कार्यक्रम माडिया भाषेतून सादर केले. लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी "खर्रा विष आहे.' हे स्टीकर डॉ. अभय बंग व उपस्थित मान्यवरांना लावून स्वागत केले. संचालन जिल्हा मुक्तीपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी केले. आभार तालुका मुक्तिपथचे संघटक केशव चव्हाण यांनी केले. आयोजनासाठी तालुका प्रेरक चिन्ना महाका, आबिद शेख, प्रा. गिरीश कुलकर्णी, विनीत पद्मावार, विडपी यांनी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 98 villages in Bhamragad taluka are free of wine drinking