‘अम्मी, मैं अब स्कूल जाऊंगी’

Aarju-Shaikh
Aarju-Shaikh

नागपूर - जम्मू-काश्‍मीरमध्ये राहणारी पाच वर्षांची चिमुकली. गुलाबासारखा टवटवीत चेहरा, मात्र डोळ्यांनी दगा दिला. तिरळेपणा घेऊन जन्माला आल्याने घरातून बाहेर निघत नव्हती. अम्मी शाळेत घेऊन गेली तरच ती बसायची... सारेच तिच्या डोळ्यांवरून चिडवायचे. चिमुकलीच्या तिरळेपणामुळे तिची अम्मी नाराज असे... अशावेळी तिच्या मदतीला सक्षम धावून आले. या संस्थेने तिच्यावरील उपचारासाठी मदत केली आणि सामान्य मुलांप्रमाणे ती पाहू  लागली. अम्मी, मैं अब अकेली स्कूल जाऊंगी’ असे म्हणतच तिने आईला कवटाळले. हा क्षण पाहताच उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. 

स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन या रुग्णालयातील हा अनुभव. आरजू जान मोहम्मद शेख असे या चिमुकलीचे नाव. मूळचे जम्मू-काश्‍मीर येथील अनंतनाग येथील रहिवासी. मुलीच्या तिरळेपणामुळे आईवडिलांसह कुटुंबामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. बऱ्याच ठिकाणी उपचार झाले.

परंतु, फायदा झाला नाही. हलाखीच्या परिस्थितीमुळे खर्च आवाक्‍याबाहेरचा होता. मुलीच्या डोळ्यांतील तिरळेपण दूर करण्यासाठी ड्रायव्हर असलेले तिचे अब्बा मोहम्मद शेख यांनी प्रयत्न केले. प्रयत्न करूनही खर्चाची रक्कम गोळा करता आली नाही. अनेकांना मदत मागितली, परंतु सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. 

आशेचा किरण दिसला
आर्थिक स्थिती बेताची असलेल्यांवर नागपुरातील सक्षम नावाची संस्था मदत करीत असल्याची माहिती विवेकानंद मिशनतर्फे मिळाली. या कुटुंबाने नागपूर गाठले आणि दोन दिवसांपूर्वी  आरजूच्या नजरेतील ‘तिरळे’पण सक्षमने दूर केला.

अनंतनाग ते नागपूर असा प्रवास करताना जम्मू-काश्‍मीरच्या पलीकडचे शहर या कुटुंबाला माहिती नव्हते. १ हजार ८५० किलोमीटरचा प्रवास प्रथमच या कुटुंबाने केला. काही वर्षांपूर्वी अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात जावेद अहमद तख यांना गोळी लागली होती. त्यामुळे ते कायमचे अपंग झाले. परंतु, जावेद इथेच थांबले नाही, या अवस्थेतही त्यांनी काश्‍मिरातील दिव्यांगांसाठी शाळा सुरू केली. या शाळेत ‘सक्षम’च्या कार्याची माहिती झाली. त्यांनी संपर्क साधला आणि आरजूला पत्नीसोबत पोचवण्याची सोय केली. 
- शिरीष दारव्हेकर, अनुसंधान प्रमुख, सक्षम, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com