आभा पांडे यांचा नागरिकांसह जलत्याग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

नागपूर : पाण्यावर चर्चेसाठी नोटीस दिल्यानंतरही महापौरांनी विषय न घेतल्याने सभागृहात संतप्त झालेल्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक नागरिकांसह आजपासून जलत्याग आंदोलन सुरू केले. सायंकाळी नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनीही पांडे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेत मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दरम्यान, पांडे यांनी जलप्रदाय समिती अध्यक्ष पिंटू उपाख्य विजय झलके व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना परत पाठविले.

काल, गुरुवारी महापालिकेची सभा पार पडली. या सभेत प्रभागातील नागरिकांच्या पाणीसमस्येवर चर्चेसाठी अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी नोटीस दिली होती. विषयपत्रिकेतही त्यांच्या नोटीसचा उल्लेख करण्यात आला होता. परंतु, महापौर नंदा जिचकार यांनी पाणीटंचाईच्या विषयावरील दोन स्थगन प्रस्ताव स्वीकारले, त्यावर चर्चा झाली. आता पुन्हा वेगळी चर्चा नको, असे नमूद करीत पुढील विषय पुकारले. त्यामुळे आभा पांडे यांनी प्रभागातील समस्येवर चर्चेची विनंती केली. परंतु, महापौरांनी तीही फेटाळून लावल्याने संतप्त झालेल्या पांडे यांनी रोष व्यक्त करीत विषयपत्रिका फाडून महापौरांच्या आसनापुढे भिरकावली. त्यांनी महापौरांच्या निषेधार्थ आंदोलनाचा निर्धार केला. आज सकाळी अकरापासून त्यांनी सतरंजीपुरा झोनमध्ये प्रभागातील नागरिकांसह जलत्याग आंदोलन सुरू केले. आज दिवसभर त्यांनी पाण्याला हातही न लावल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला. जलप्रदाय समिती अध्यक्ष पिंटू झलके, प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्‍वेता बॅनर्जी यांनी सायंकाळी पांडे यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, आभा पांडे यांनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे प्रशासन कात्रीत सापडले. दरम्यान, सायंकाळी कॉंग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणेही आंदोलनात सहभागी झाले. त्यांनीही जलत्याग आंदोलन सुरू केले. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता आणखीच वाढली असून आंदोलन चिघळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abha Pandey agitation news