नायजेल शॉर्ट म्हणतात, रौनकमध्ये जग जिंकण्याचे सामर्थ्य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पुणे येथील लक्ष्य स्पोर्टस या स्वयंसेवी संघटनेतर्फे सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये रौनक साधवानीच्या सत्कार समारंभप्रसंगी पत्रकारांशी बोलताना शॉर्ट म्हणाले, भारतीय खेळाडूंच्या टॅलेंटबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. माजी विश्‍वविजेता विश्‍वनाथन आनंदनंतर भारताने अनेक दर्जेदार बुद्धिबळपटू जगाला दिले आहेत.

नागपूर : भारतात प्रतिभावान बुद्धिबळपटूंची खाण असून, अनेक युवा उदयास येत आहेत. भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेता भविष्यात रशियाप्रमाणे भारतही बुद्धिबळातील "सुपरपॉवर' बनू शकते, असे भाकीत विश्‍व बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) उपाध्यक्ष व इंग्लंडचे ग्रॅण्डमास्टर नायजेल शॉर्ट यांनी व्यक्‍त केले. नागपूरकरचा पहिला ग्रॅण्डमास्टर रौनक साधवानीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगून, त्यांनी खेळाडूंना यशासाठी "शॉर्टकट'चा उपयोग न करण्याचाही यावेळी सल्ला दिला. 

पुणे येथील लक्ष्य स्पोर्टस या स्वयंसेवी संघटनेतर्फे सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये रौनक साधवानीच्या सत्कार समारंभप्रसंगी पत्रकारांशी बोलताना शॉर्ट म्हणाले, भारतीय खेळाडूंच्या टॅलेंटबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. माजी विश्‍वविजेता विश्‍वनाथन आनंदनंतर भारताने अनेक दर्जेदार बुद्धिबळपटू जगाला दिले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्याप्रमाणे रशियाने बुद्धिबळात वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचप्रमाणे भारतही ही किमया करू शकतो.


ग्रॅंडमास्टर रौनक साधवानीचा सत्कार करताना आमदार गिरीश व्यास. सोबत फिडेचे उपाध्यक्ष नायजेल शॉर्ट आणि अभिजीत कुंटे.
 

भविष्यात मी भारताकडे बुद्धिबळातील एक "सुपरपॉवर' देश म्हणून बघतो आहे. शॉर्ट यांनी त्यासाठी आयपीएलच्या धर्तीवर भारतात बुद्धिबळ लीग सुरू करण्याचा सल्ला दिला. या लीगमुळे देशभरातील युवा बुद्धिबळपटूंना व्यासपीठ मिळून ते या खेळाकडे आकर्षित होतील. 

याप्रसंगी राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेतील रौप्यपदक विजेते भारतीय ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, आमदार गिरीश व्यास यांच्यासह लक्ष्य स्पोर्टसचे महाव्यवस्थापक यतिन श्रीवर्धनकर, रौनकचे आईवडील व बुद्धिबळप्रेमी उपस्थित होते.

 हेही वाचा : कुचबिहार करंडक : विदर्भाचे पोट्टे जिंकले रे ब्वॉ... 

2019 मध्ये ग्रॅण्डमास्टर किताब 

14 वर्षे वयोगटात जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या रौनकने गेल्या ऑक्‍टोबरमध्ये आयजल ऑफ मॅन ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा व शेवटचा नॉर्म पूर्ण करून प्रतिष्ठेच्या ग्रॅण्डमास्टर किताबावर शिक्‍कामोर्तब केले होते. असा बहुमान मिळविणारा रौनक हा नागपूरचा पहिला, ग्रॅण्डमास्टर स्वप्नील धोपाडेनंतर विदर्भाचा दुसरा आणि भारताचा एकूण 65 वा ग्रॅण्डमास्टर ठरला. 

 

रौनकमध्ये प्रचंड "टॅलेंट' 

13 वर्षीय रौनकबद्दल बोलताना शॉर्ट म्हणाले, रौनकमध्ये अपार "टॅलेंट' आहे. तो खूप मेहनती असून, "चॅम्पियन' खेळाडूला आवश्‍यक असलेला संयम व प्रचंड आकलनशक्‍ती त्याच्यात ठासून भरली आहे. उल्लेखनीय म्हणजे त्याच्यात विजयाची प्रचंड भूक आहे. याशिवाय त्याला बुद्धिबळाचे भरपूर ज्ञान आहे. या सर्व गुणांमुळेच त्याने अत्यंत कमी वयात ग्रॅण्डमास्टर नॉर्म मिळविला आहे. रौनकमध्ये जगातल्या पहिल्या 50 बुद्धिबळपटूंमध्ये स्थान पटकाविण्याची तसेच 2700 येलो रेटिंग गुण मिळविण्याची पूर्ण क्षमता असल्यने कामगिरीत सुधारणा करण्यासाठी विशेषत: लक्ष केंद्रित करण्यासाठी शॉर्ट यांनी रौनकला पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. 

आनंदने का निवृत्त व्हावे? 

गेल्या तीन-चार दशकांपासून भारतीय बुद्धिबळाला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देणारा माजी जगज्जेता ग्रॅण्डमास्टर विश्‍वनाथन आनंदने निवृत्त व्हावे काय? या प्रश्‍नाच्या उत्तरात नायजेल शॉर्ट म्हणाले, आनंद 50 वर्षांचा झाला असला तरी, तो अजूनही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करीत आहे. उल्लेखनीय म्हणजे, सद्य:स्थितीत तो जागतिक क्रमवारीत "टॉप टेन'मध्ये आहे. जोपर्यंत त्याची खेळण्याची इच्छा आहे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करीत असेल, तर त्याने यापुढेही खेळत राहावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. 

रौनकची कामगिरी 

2015 मध्ये कॅंडिडेट मास्टर किताब 
2017 मध्ये फिडे मास्टर किताब 
2018 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर किताब 
2019 मध्ये ग्रॅण्डमास्टर किताब 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ability to win the world in Raunak, says Nigel Short