esakal | तरुणाला डॉक्टर बनविण्यासाठी स्वतःची झोळी रिकामे करणारे अबरारभाई...
sakal

बोलून बातमी शोधा

Abrar Siddiqui Assistance of Rs. 14 lakhs to the youth

जातीपातीला थारा न देणारी लोकही या पृथ्वीतलावर आहेत, हेच हाजी अबरार सिद्दीकी यांनी आपल्या समाजकार्यातून दाखवून दिले.

तरुणाला डॉक्टर बनविण्यासाठी स्वतःची झोळी रिकामे करणारे अबरारभाई...

sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : 1990 मध्ये एक दिवसाच्या अंतराने हृदयविकाराने आई-वडिलांचे झालेले निधन... 1997 मध्ये अपघातात मुलीचा झालेला मृत्यू... त्यापाठोपाठ अवघ्या महिनाभरात आजाराने मुलगाही गतप्राण झाला... एकापाठोपाठ एक आप्तांच्या जाण्याचे दु:ख त्यांनी पचवले... जीवनात आपले काहीच नाही, हे कळून चुकले होते. जे आपले नाही त्याचा मोहतरी कशाला, याच भावनेतून गरजवंतांना मदत करणे सुरू केले. समाजातील मग तो कोणत्याही जातीधर्मातील असो, अशा पीडित, शोषित घटकाला लागेल ती मदत करण्याचा विडाच त्यांनी उचलला... समाजकार्यात वाहून घेतलेल्या गोंदियाच्या रामनगरातील हाजी अबरार सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच एका तरुणाला एक दोन नव्हे तर तब्बल 14 लाख रुपयांची मदत करीत त्याच्या एमडी प्रथम वर्ष प्रवेशाचे स्वप्न पूर्ण केले.

शहर असो वा गाव, राजकारण असो वा समाजकारण यात जातीपातीचे धोरण आजही कायम आहे. परंतु, जातीपातीला थारा न देणारी लोकही या पृथ्वीतलावर आहेत, हेच हाजी अबरार सिद्दीकी यांनी आपल्या समाजकार्यातून दाखवून दिले. आई-वडील, एक भाऊ, पत्नी असे हाजी अबरार सिद्दीकी यांचे कुटुंब. गोंदिया तालुक्‍यातील एकोडी येथे पेट्रोलपंप आणि आसपास शेती. कुटुंबातील सदस्य गुण्यागोविंदाने नांदत असताना 1990 मध्ये केवळ एका दिवसाच्या अंतराने आई-वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले.

1997 हे सालदेखील अतिशय दुःखद ठरले. ट्रॅक्‍टर अपघातात मुलीचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ महिनाभराने मुलगाही आजाराने गतप्राण झाला. आई-वडिलांपाठोपाठ दोन मुलांच्या एकाएकी जाण्याने दुःखाचे सावट असताना जीवन क्षणभंगूर आहे. जीवनात आपले स्वतःचे काहीच नसते, ही भावना त्यांच्या मनात आली. त्यांनी जात, पात, धर्माला थारा न देता थेट सामाजिक कार्यात उडी घेतली. पीडित, शोषित घटकांना त्यांनी केंद्रस्थानी ठेवले. आपल्या हातून जितके सत्कर्म करता येईल, तितके करण्याचा जणू विडाच उचलला.

मंत्री महोदय जरा नागपूरकडेही लक्ष द्या...

गेल्या दहा वर्षांच्या आपल्या सामाजिक कार्यात त्यांनी अनेक गरजूंना मदत केली. युवा एकता मंचच्या माध्यमातून दरवर्षी स्टुडंट अवॉर्ड ते देत असतात. हे काम करीत असताना एका तरुणाचे जीवन फुलविणारा असा निर्णय त्यांनी आठ-दहा दिवसांपूर्वी घेतला. येथीलच एका तरुणाला एमबीबीएसनंतर NEET PG मधून MD करिता प्रवेश मिळाला होता. त्यासाठी त्याला 13 लाख 70 हजार रुपयांची गरज होती.

इतकी रक्कम त्या तरुणाकडे नव्हती. अशातच तो सिद्दीकी यांच्या घरी सहज गेला. काही चर्चा झाल्यानंतर त्या तरुणाला पैशाची गरज असल्याचे कळले. हाजी अबरार यांनी हीच बाब पत्नीलाही सांगितली आणि काही क्षणातच त्यांनीही पैसे देण्यास होकार दिला. त्वरित त्यांनी रक्‍कम दिल्याने प्रवेशही झाला. त्यामुळे एका तरुणाचे एमडीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. अबरार भाई यांना एक मुलगा असून, तोही उच्चशिक्षित आहे.

 
तरुणाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद
काही दिवसांपूर्वीच रमजान ईद साजरी झाली. या दिवसांतच आपल्या हातून चांगले काम झाले. एका तरुणाचे स्वप्न पूर्ण झाले, याचा मला आनंद आहे.
- हाजी अबरार सिद्दीकी, गोंदिया. 

loading image