हत्याकांडातील फरार आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

सक्करदरा ः सक्‍कदऱ्यात एका युवकाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला सक्‍करदरा पोलिसांनी सापळा रचून जुनी कामठी परिसरातून अटक केली. तो गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मजीद अहमद ऊर्फ बम्बईया अब्बास अली (27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सक्करदरा ः सक्‍कदऱ्यात एका युवकाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला सक्‍करदरा पोलिसांनी सापळा रचून जुनी कामठी परिसरातून अटक केली. तो गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. मजीद अहमद ऊर्फ बम्बईया अब्बास अली (27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजीद अहमद हा मूळचा धुळेचा राहणारा आहे. 2014 मध्ये तो पत्नीसह नागपूरला आला. मोठा माजबाग येथे किरायाने खोली घेऊन तो राहत होता. 2014 मध्ये अब्दुल वसीम सत्तार (22, रा. यासीन प्लॉट, मोठा ताजबाग) याचे मजीदच्या पत्नीसोबत वाद झाला होता. हा राग मनात ठेवून मजीदने वसीमचा चाकूने भोसकून खून केला होता. त्यानंतर तो पत्नीसह नागपुरातून फरार झाला होता. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून मजीदचा शोध घेतला. परंतु, तो कुठेही सापडला नाही. पोलिसांनी कलम 299 सीआरपीसी अन्वये त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
नागपुरातून पळ काढल्यानंतर तो आपल्या मूळ गावी धुळे येथे गेला. तेथून तो कामासाठी सूरतला गेला. दोन महिन्यांपूर्वी तो कामठी येथे आला होता. पाच वर्षांपासून मजीद फरार असल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित करून त्याचा शोध घेण्याचे आदेश सक्करदरा पोलिसांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशान्वये ठाणेदार अजित सिद यांच्या पथकातील हवालदार संजय सोनवणे, प्रमोद हिवरकर, शिपाई आनंद, राशिद, मनोज, पवन, विद्याधर यांनी मजीदचा शोध घ्यायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी ताजबाग येथे राहणाऱ्या तरुणांना मजीद हा जुनी कामठी येथील बसस्टॉपजवळ दिसून आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची माहिती काढली. तो मजीदचा असल्याची खात्री पटताच पोलिसांनी काल रात्री त्याला सापळा रचून अटक केली. हत्याकांडानंतर आणखी काही गुन्ह्यात मजीतचा समावेश आहे, याचाही शोध पोलिस घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absconding accused in murder case arrested