भाजप सरकार सत्तेवर आले अन बारगळला हा प्रस्ताव

केवल जीवनतारे
बुधवार, 18 डिसेंबर 2019

विदर्भासह मध्य भारतातील आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतून मेडिकलच्या नेत्ररोग विभागात रुग्ण उपचारासाठी येतात. मेडिकलमध्ये "फेको' सर्जरीची सोय आहे. बुबुळांचे प्रत्यारोपण केले जाते. या वर्षी 50 पेक्षा अधिक बुबुळे प्रत्यारोपण झाली. लहान मुलांचे अंधत्व, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रेटिनावरील शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. यामुळे मुंबई, हैदराबाद आणि मदुराईत जाणाऱ्या नेत्ररुग्णांची संख्या कमी झाली.

नागपूर : मेडिकलमध्ये प्रादेशिक नेत्रचिकित्सा व संशोधन संस्था उभारण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला 2012-13 मध्ये हिरवी झेंडी मिळाली होती. मात्र, 2014 मध्ये सत्ताबदल झाला. भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले व हा प्रस्ताव बारगळला. यानंतर 2017 मध्ये मेडिकलमध्ये बुबूळ संशोधन प्रयोगशाळा उभारण्यास मंजुरी मिळाली. पावणेदोन कोटींतून उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर झाले. तेही मंजूर झाले. राज्यातील ही पहिलीच प्रयोगशाळा असेल, असा गाजावाजा करण्यात आला. मात्र, मेडिकलच्या नेत्ररोग विभागात उभारल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेचा प्रस्तावही बारगळला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

विदर्भासह मध्य भारतातील आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतून मेडिकलच्या नेत्ररोग विभागात रुग्ण उपचारासाठी येतात. मेडिकलमध्ये "फेको' सर्जरीची सोय आहे. बुबुळांचे प्रत्यारोपण केले जाते. या वर्षी 50 पेक्षा अधिक बुबुळे प्रत्यारोपण झाली. लहान मुलांचे अंधत्व, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रेटिनावरील शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. यामुळे मुंबई, हैदराबाद आणि मदुराईत जाणाऱ्या नेत्ररुग्णांची संख्या कमी झाली.

ठळक बातमी - महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार

अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अशोक मदान यांनी या विभागाचा विकास केला. मेडिकलमध्ये ही सोय सुरू झाल्याने शस्त्रक्रियांवरील खर्च लागणार नाही. गरीब व दारिद्यरेशेखाली मोडणाऱ्या रुग्णांची गर्दीही वाढली. मागील सरकारकडून "बुबूळ संशोधन प्रयोगशाळा' तयार करण्यासाठी मंजुरी मिळाली. डॉ. मदान यांनी प्रस्ताव तयार केला. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना हा प्रस्ताव सादर केला. हिरवी झेंडी मिळाली. जागा निश्‍चित झाली होती. परंतु, "एम्स' उभारण्याचा निर्णय झाल्यामुळे येथे ही प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय थंडबस्त्यात गेला आहे.

पावणेदोन कोटींतून होणारा खर्च

या प्रयोगशाळेसाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी 75 लाखांचे अनुदान मिळणार आहे. यातून स्पेकुलर मायक्रोस्कोप, बुबुळाची अवस्था बघणारे तसेच जाडी मोजणारे ऍटेरियर सेगमेंट (ओसीटी), ऍटेरिअर व्हिक्‍ट्रोटॉमी अशी यंत्रे खरेदी करण्याचा आराखडा तयार केला होता. या प्रयोगशाळेत एका बुबुळातून 4 ते 5 पडदे वेगळे करण्याची प्रक्रिया होणार होती. याचा लाभ 4 ते 5 अंधांना नजर देण्यासाठी होणार होता.

सरकारने घ्यावा पुढाकार

तत्कालीन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या काळात प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय झाला होता. मध्य भारतातील गरिबांच्या बुबूळ नेत्रविकारावर तसेच वैद्यकीय संशोधनासाठी ही प्रयोगशाळा वरदान ठरली असती. परंतु, या प्रयोगशाळेचा प्रस्ताव थंडबस्त्यात असल्याने विद्यमान अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी हा प्रस्ताव पुन्हा सादर केल्यास ही संस्था आकाराला आणता येईल, अशी चर्चा मेडिकल वर्तुळात रंगली आहे. सरकारने पुढाकार घ्यावा, अशीही चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acacia Research Laboratory dropped