70 हजारांची लाच घेताना तहसीलदार जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

भंडारा : वाळू वाहतूकदाराकडून 70 हजारांची लाच स्वीकारताना मंगळवारी (ता. 30) गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील तहसीलदार संजय यादवराव रामटेके व एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. त्यांच्याविरोधात तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भंडारा जिल्ह्यातील धारगाव येथील तक्रारदाराचा ट्रकने (क्रमांक एमएच 36/एए 2358) तुमसर तालुक्‍यातील चारगाव घाटावरून वाळू वाहतूक करण्यात येत होती. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा जंगलात तिरोडा येथील तहसीलदार संजय यादवराव रामटेके यांनी ट्रक थांबवला. त्यांनी सदर ट्रक वळवून सुकळी गावाकडे नेला. तेथे कार्यवाही न करण्यासाठी 40 हजार रुपयांची मागणी केली. तसेच तक्रारकर्त्याच्या मित्राचे दोन ट्रक सुरू ठेवण्याकरिता मासिक 30 हजार रुपये असे एकूण 70 हजारांची मागणी केली. या प्रकराबाबत ट्रक मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार दिली.
त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे मंगळवारी तिरोडा येथील तहसील कार्यालयात सापळा रचून कारवाई केली. दरम्यान तिरोडा येथील तहसीलदार संजय यादवराव रामटेके यांनी 70 हजार रुपयांची मागणी केली व माडगी येथील खासगी व्यक्ती विपिल सिद्धार्थ कुंभारे याच्या हस्ते लाच स्वीकारली. त्यामुळे तुमसर पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACB trap in tirora