वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी स्वीकारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नागपूर ः वनसंवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने वन्यजीव रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गोपाळ ठोसर यांनी येथे केले.

नागपूर ः वनसंवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने वन्यजीव रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गोपाळ ठोसर यांनी येथे केले.
सेमिनरी हिल्स येथील हरिसिंग सभागृहातील वन्यजीव सप्ताहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन) साईप्रकाश, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. एस. हुडा, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक टी. के. चौबे उपस्थित होते. ठोसर यांनी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळात केलेल्या कामाची माहिती दिली. वन व वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी मनापासून स्वीकारा असे आवाहन त्यांनी केले.
वन्यजीव व मानव संघर्ष कमी करणे मोठे आव्हान आहे. ते कमी करण्यासाठी वन खाते उपाययोजना करीत असले तरी सर्व घटकांतील नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक उमेशकुमार अग्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले, वन विभाग व विविध निसर्ग संवर्धनासाठी कामे करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने वन्यजीवांच्या संवर्धनामध्ये आपण यशस्वी झालो. परंतु, संरक्षित क्षेत्रातील गावांचा विकास व्हावा यासाठी संवर्धन करीत असताना ज्या ग्रामीण नागरिकांना संघर्षाचे चटके बसले, त्याच्यापर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. संघर्षातून सहजीवनाकडे या आशयावर आधारित या वर्षीचा वन्यजीव सप्ताह साजरा करीत आहोत असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक वनसंरक्षक अमलेंद्रू पाठक यांनी केले. संचालन प्रसिद्धी व माहिती अधिकारी स्नेहल पाटील यांनी केले. आभार विभागीय वनाधिकारी गीता नन्नावरे यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accept responsibility for wildlife conservation