टँकर आणि मोटर सायकलच्या धडकेत युवक ठार
अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे. याबाबत सुभाष बाबुलाल मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकर चालका विरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असुन पोलिस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार नारायण पाटील, निलेश ब्राम्हणकर करीत आहेत.
एरंडोल - भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने समोरून येणाऱ्या मोटर सायकलला समोरून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ३२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर टँकर चालक वाहन सोडून फरार झाला असुन हा अपघात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील न्यु इंग्लिश स्कुल जवळ असलेल्या अंजनी प्रकल्पाच्या पाटचारी जवळ झाला.
याबाबत माहिती अशी की, एरंडोल येथील अमळनेर दरवाजा परिसरातील रहिवासी समाधान दत्तात्रय खैरनार (मराठे) (वय ३२) हा मोटर सायकल क्रमांक एम.एच.१९ सी.एच.२०२६ ने जळगाव येथुन एरंडोल येथे घरी येत असतांना न्यु इंग्लिश स्कुल जवळ जळगाव कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकर क्रमांक एम.एच.४३ व्ही.जी.३५८५ ने मोटर सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटर सायकल चालक समाधान खैरनार (बापु मराठे) हा युवक डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे जागीच ठार झाला.
अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे. याबाबत सुभाष बाबुलाल मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकर चालका विरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असुन पोलिस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार नारायण पाटील, निलेश ब्राम्हणकर करीत आहेत. दरम्यान अपघातात मयत झालेला समाधान खैरनार याचा केवळ दीड वर्षापुर्वी विवाह झाला असुन अमळनेर दरवाजा येथे घरासाठी तसेच दुकानांसाठी लागणाऱ्या लोखंडी व स्टीलचे साहित्य तयार करण्याचा वेल्डिंगचा व्यवसाय करीत होता. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव त्याचा होता. बापु या टोपण नावाने तो परिचित होता. त्याचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या अमळनेर दरवाजा परिसरातील निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मयत समाधान खैरनार हा जळगाव येथुन केलेल्या कामाचे पैसे घेऊन घरी येत असतांनाच काळाने रस्त्यावरच त्याच्यावर घाला घातला. एरंडोल पासुन केवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका धाब्यावर त्याने मठ्ठा घेतला व तेथुनच आपल्या चुलत भावाला मोबाईल वरून मी आलो असुन मठ्ठा पिऊन दहा ते पंधरा मिनिटात घरी येत असल्याचे सांगितले होते. मात्र निवासस्थान केवळ दीड किलोमीटरवर असतांना त्याचा अपघतात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्याजवळ असलेले पैसे व चेक गायब झाल्याची चर्चा सुरु होती.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.
- 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
- शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
- राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.