अपघातानंतर चार तास चक्‍काजाम

Accident
Accident

भिवापूर - नागपूर-गडचिरोली महामार्गावर भिवापूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी जाळपोळ करीत चार तास वाहतूक रोखून धरली. जमावाने एका खासगी बसला आग लावल्यानंतर मात्र पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 

सुगंधा धनराज पिंपळकर (वय १७, रा. हिवरा, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर पूर्वाक्षी करकाडे (वय १७), मोनू वैद्य (वय १४, दोन्ही रा. नक्षी, ता. भिवापूर), दीपाली देवा नागरीकर (वय १७, रा. धर्मापूर, भिवापूर), ऐश्वर्या बोदिले (वय १७), धनश्री आकरे (वय १६, दोन्ही रा. भिवापूर) या जखमी झाल्या. यापैकी पूर्वाक्षीची प्रकृती गंभीर आहे.

जखमीपैकी दोघींना उमरेड तर दोघींना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सर्व विद्यार्थिनी भिवापूर येथील राष्ट्रीय कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. अपघातानंतर ट्रकचालक संतोष सिंग दिवान सिंग (वय ४५, रा. भानुबासा, जमशेदपूर, झारखंड) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही युवकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

अपघातानंतर लगेचच वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शहरातील वाहतूक पोलिसांसह ठाणेदारालाही निलंबित करण्याची मागणी करीत महिलांनी घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत व उपविभागीय पोलिस अधिकारी पौर्णिमा ठावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. चार तासांनंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करीत अश्रुधुराच्या चार नळकांड्या फोडाव्या लागल्या. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

नादुरुस्त बसमुळे अपघात
महामार्गावर एका पेट्रोल पंपासमोर नादुरुस्त खासगी बस गेल्या दोन वर्षांपासून उभी आहे. या बसला जमावाने आग लावली. या नादुरुस्त बसमुळे अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या बसमुळेच विद्यार्थिंनींना रस्ता ओलांडण्यास उशीर झाला व भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. 

राजकीय नेत्यांच्या भेटी 
अपघातानंतर उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांच्यासह आमदार कीर्तिकुमार भांगडिया तसेच काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय मेश्राम, जिल्हा काँग्रेसचे महासचिव राजानंद कावळे यांनी परिस्थितीचा आढावा घेत पोलिसांबाबतच्या तक्रारी अधीक्षकांकडे केल्या. भिवापूर तालुक्‍यातील अवैध वाहतुकीबद्दल माहिती देत कारवाईची मागणी केली.

बाजारपेठ बंद, शाळांना सुटी
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ठाणेदार तसेच वाहतूक पोलिसांना निलंबित करण्याची मागणी करीत वाहतूक रोखून धरली. नागरिकांनी रस्त्यावर विविध ठिकाणी टायर जाळले. तणाव वाढल्यामुळे दुकाने व बाजारपेठ बंद झाली. शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याने नागरिकांचा संताप वाढत गेला. दरम्यान, दोन बस व दोन ट्रकच्या काचा जमावाने फोडल्या. 

पोलिसांच्या वाहनाला अपघात 
भिवापूर येथे अपघातस्थळी बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला नजीकच्या उंबरगाव शिवारात ट्रकने धडक दिली. यात ईश्वर वानखेडे व लोमेश गायधने हे दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com