लग्न समारंभात डिजेेच्या तालावर थिरकने भोवले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

एका लग्नसमारंभात डिजेच्या तालावर थिरकने अंगलट आले. चक्क नवरदेवाची गाडीच नाचणाऱ्यांच्या अंगावर गेली आणि 7 जण जखमी झाले.

कारंजा (लाड) - सध्या लग्नसराइचा सपाटा सुरू असून, या लग्नसमारंभात लहानापासून थोरांपर्यंत डिजेच्या तालावर थिरकण्याची जणू एक प्रथाच निर्माण झाली आहे. अशाच एका लग्नसमारंभात डिजेच्या तालावर थिरकने अंगलट आले. चक्क नवरदेवाची गाडीच नाचणाऱ्यांच्या अंगावर गेली आणि 7 जण जखमी झाले. ही घटना कारंजा तालुक्यातील पोहा येथील तुळजाभवानी मंदिरात असलेल्या लग्नसमारंभात घडली.

अधिक माहितीनुसार, पोहा येथील तुळजाभवानी मंदिरात 11 मे रोजी दुपारी 11 वाजता कारंजा तालुक्यातील बेलमंडळ येथील राजू मनवर यांची कन्या कु दिक्षा व मंगरूळपीर तालुक्यातील भूर येथील महादेव भगत यांचे चिरंजीव सतिश हे वधुवर विवाहबध्द झाले. बेलमंडळ येथील मनवर व भूर येथील भगत परिवाराचा हा लग्नसोहळा होता. या लग्नसोहळ्यात नवरदेव बोहल्यावर चढण्याआधी हनुमान मंदिरातून एम एच 12 पी क्यु 8435 क्रमांकाच्या मारूती सुझुकी या गाडीने लग्न मंडपात जात असतांना वरातीतील काही मंडळी नवरदेवाच्या गाडीसमोर डिजेच्या तालावर थिरकत होती. अशातच नवरदेवाच्या गाडीचालकाचा ब्रेकवरील पाय घसरून अॅक्सीलेटरवर पडला. आणि नवरदेवाची गाडी चक्क वरातीत थिरकणाऱ्यांच्या अंगावर गेली.

या घटनेत वर मायसहीत 7 जण जखमी झाले. माला धम्माचंद आडोळे रा. भुर ता मंगरूळपीर, लक्ष्मी अरूण इंगोले रा. कोंडोली ता. मानोरा, वंदना महादेव भगत रा. भूर ता. मंगरूळपीर, ज्ञानूबाई मोतीराम मनवर रा. शिरजगाव ता. मंगरूळपीर, जयवंताबाई अंबादास भगत, कोमल सुखदेव अजळे व वनमाला विठ्ठल आडोळे रा. भूर ता. मंगरूळपीर यांचा जखमी व्यक्तीत समावेश आहे. जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर यातील तीन व्यक्ती गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रवाना करण्यात आले. या घटनेवरून लग्नसमारंभात डिजेच्या किंवा बॅंडपार्टीच्या तालावर थिरकणाऱ्यांनी सावधानी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Accident by Grooms car and seven people were injured

टॅग्स