जाम-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कार वाहनावर धडकली; दोघांनी गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 February 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल नगराळे आणि नितीन भगत हे सकाळच्या सुमारास एमएच 31-सीपी 6577 या क्रमांकाच्या कारने जाम नागपूर महामार्गाने जामकडून नागपूरकडे जात होते.

जाम (जि. वर्धा) : जामकडून नागपूरकडे जाणारी भरधाव कार समोरील अनोळखी वाहनावर धडकली. या भीषण धडकेत कारचा चेंदामेंदा झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह कारमधून ओढून बाहेर काढावे लागले. जाम-नागपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी सहा वाजता हा अपघात घडला. अमोल सुभान नगराळे (वय 25) रा. मारेगाव, जि. यवतमाळ व नितीन भगत (वय 21) रा. कोरा. ता. समुद्रपूर, अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल नगराळे आणि नितीन भगत हे सकाळच्या सुमारास एमएच 31-सीपी 6577 या क्रमांकाच्या कारने जाम नागपूर महामार्गाने जामकडून नागपूरकडे जात होते. कार समोरच अनोळखी वाहन होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार समोरील वाहनावर आदळली. 

शेतकरी नेते राजेश टिकैत केंद्र सरकारविरोधात रणशिंग फुंकणार; यवतमाळात होणार जाहीर सभा

या भीषण धडकेच कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. कारमध्येच दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत अमोल नगराळे आणि नितीन भगत यांना कारमधून बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविले. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. 

कारमधून मृतांना बाहेर काढण्याकरिता जाम महामागृा पोलिसचे पोलिस निरीक्षण भरत कराळे, उपनिरीक्षक कुमरे, चालक ज्योती गावंडे, दिलीप वांदिले, गौरव खरवडे, बंडू डडमल, श्रीनाथे यांनी सहकार्य केले. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळतीत केली. 

सावधान! स्क्रब टायफस पुन्हा आला; उपराजधानीत आढळले दोन रुग्ण

जाम चौरस्त्यावर अपघातांची मालिका

जाम चौरस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असते. या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. रस्ते गुळगुळीत झाल्याने या परिसरात अपघातांची मालिका सुरूच असते. शिवाय आतापर्यंत अनेकांचा जीवसुद्धा गेला आहे. पोलिसांनी या परिसरात अपघात टाळण्याकरिता उपाययोजना कराव्या, अशी नागरिकांची मागणी आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Jam Nagpur highway 2 people dead