अकरावीचा पेपर देण्यासाठी जाणारा विद्यार्थी जागीच ठार

रवींद्र शिंदे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

विशाल रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी किरकोळ जखमी झाली.

मुकुटबन (जि. यवतमाळ) - येथील आश्रमशाळेत अकरावी विज्ञान शाखेचा शेवटचा पेपर देण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्याच्या दुचाकीला रोही या वन्यप्राण्याने जबर धडक दिली. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला, तर दुचाकीवर मागे बसलेली त्याची बहीण किरकोळ जखमी झाली. हा अपघात मुकुटबन-पाटण मार्गावरील सितारा बिअरबार समोर आज गुरुवारी (ता.12) सकाळी सातच्या सुमारास झाला.

विशाल भास्कर पिंपळकर (वय 17, रा. गणेशपुर) असे मृत विद्यार्थ्याचे व वैष्णवी पिंपळकर असे जखमीचे नाव आहे. हे दोन्ही भावंडे दुचाकीने (क्रमांक एमएच 29 इ 3248) राहत्या गणेशपूर येथून आश्रमशाळेत येत असताना हा अपघात झाला. त्यात विशाल रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी किरकोळ जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी झाली होती. मुकुटबन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. विशाल हा हुशार व मनमिळावू विद्यार्थी असल्याने त्याच्या शाळेसह गावातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Accident in Yavatmal Young Boy Died Sister Injured