शास्त्रीय गायिका गायत्री कानिटकर यांचे अपघाती निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नागपूर - शास्त्रीय गायिका गायत्री मकरंद कानिटकर (वय 41) यांचे आज (बुधवार) पहाटे डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागपूर - शास्त्रीय गायिका गायत्री मकरंद कानिटकर (वय 41) यांचे आज (बुधवार) पहाटे डोंगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गायत्री या आपल्या पती मकरंद यांच्यासोबत नांदेड येथे संगीत परीक्षेसाठी परीक्षक म्हणून गेल्या होत्या. मंगळवारी (ता. 20) सायंकाळी त्या टाटा झेस्ट गाडीने नागपूरला यायला निघाल्या. मकरंद गाडी चालवित होते. परतताना उमरखेड आणि यवतमाळ येथे थांबण्याचा विचार केला. मात्र, हॉटेल उपलब्ध नसल्याने थेट नागपूरच्या दिशेने निघाले. त्यांची गाडी नागपूरच्या खापरीच्या जवळील डोंगरगाव येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. ड्रायव्हर सीटच्या बाजूला गायत्री बसल्या होत्या आणि तोच भाग थेट ट्रेलरला धडकला. त्यामुळे गायत्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेत मकरंद जखमी झाले.

संगीत विशारद असलेल्या गायत्री यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून संगीत विषयात बीए आणि एमएची पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली होती. राधिकाबाई कानिटकर संगीत महाविद्यालयाच्या संचालिका होत्या. नुकतेच त्यांनी नागपूर विद्यापीठात पीएच.डीसाठी शोधप्रबंध सादर केला होता. त्यांचा मुलगा दीपांकुर शिवाजी विज्ञान महाविद्यालयात बाराव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. तर, मुलगी वृंदा मुंडले पब्लिक स्कूलमध्ये सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. गायत्री यांचे वडील जयराज दामले धरमपेठ विद्यालयाचे निवृत्त शिक्षक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि भारतीय शिक्षण मंडळाचे अ. भा. सहसंघटनमत्री मुकुल कानिटकर यांच्या त्या भावसून होत. शास्त्रीय संगीताच्या मैफलींमधील गायत्री यांचे सहगायक तसेच वाद्यकलावंतांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या निधनामुळे एकूणच संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Accidental death of a classical singer Gayatri kanitkar