तीन सहायक निबंधकांची होणार खातेचौकशी; 58.30 लाखांचा अपहार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

तिवसा येथील सहायक निबंधक कार्यालयात 2014-15 मध्ये घडलेला हा गैरव्यवहार जुलैमध्ये उघड झाला होता. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक सचिन पतंगे यांच्या तक्रारीवरून विजय लेंडे याच्याविरुद्ध 6 जुलै 2019 ला गुन्हा नोंदविण्यात आला.

अमरावती  : शेतकऱ्यांना दिली जात असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेत तब्बल 58 लाख 30 हजार रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणात सहकार विभागातर्फे तीन अधिकाऱ्यांची खाते चौकशी केली जाणार आहे. सहकार विभागाचे अवर सचिव मं. ग. जोशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत नोटीस नुकतीच बजावली आहे. 
सहायक निबंधक आर. के. सुने, सहायक निबंधक के. आर. रत्नाळे आणि सहायक निबंधक अनिरुद्ध राऊत यांना ही नोटीस बजावली आहे. पैकी सुने निवृत्त झाले आहेत, तर रत्नाळे अहमदनगर येथे जिल्हा उपनिबंधक आणि अनिरुद्ध राऊत अमरावती येथे दुग्ध विकास विभागात समकक्ष पदावर आहेत. रकमेचा थेट अपहार व गैरव्यवहार केल्याप्रकरणी सहकारी अधिकारी तथा तत्कालीन लेखाधिकारी विजय लेंडे हा अटकेपासून तुरुंगात आहे. 
तिवसा येथील सहायक निबंधक कार्यालयात 2014-15 मध्ये घडलेला हा गैरव्यवहार जुलैमध्ये उघड झाला होता. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक सचिन पतंगे यांच्या तक्रारीवरून विजय लेंडे याच्याविरुद्ध 6 जुलै 2019 ला गुन्हा नोंदविण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेंतर्गत सरकारतर्फे 4 टक्के व्याजाची रक्कम बॅंकांना दिली जाते. पर्यायाने 365 दिवसांच्या आत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते कर्ज बिनव्याजी ठरते. सरकारने तिवसा येथील सहायक निबंधक कार्यालयास दिलेल्या 4 टक्के व्याजाच्या रकमेतून लेखापाल विजय लेंडे याने सहायक आहारण व संवितरण अधिकारी, सहायक निबंधकाऐवजी स्वतःच्या स्वाक्षरीने सहा व्यवहाराद्वारे 3.30 लाखांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केली तर 5.97 लाखांची रक्कम बॅंकेला हस्तांतरित केली होती. विशेष म्हणजे सहायक निबंधकांकरिता स्वाक्षरी केलेले धनादेशसुद्धा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या तिवसा शाखेने वटविले होते. या संपूर्ण व्यवहाराची व त्यावर देखरेखीची जबाबदारी तत्कालीन सहायक निबंधक आर.के. सुने, के. आर. रत्नाळे आणि अनिरुद्ध राऊत यांची होती. प्राथमिक चौकशीत त्यांच्यावर दिरंगाईचा ठपका ठेवत त्यांची खाते चौकशी करण्याची शिफारस अमरावती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी शासनाकडे केली. त्यानुसार अवर सचिवांनी तीनही अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांकडून जे आरोप नाकबूल केले जातील, त्याच आरोपांवर चौकशी केली जाणार असल्याचे या नोटीसमध्ये नमूद आहे. कोण अधिकारी कोणते आरोप कबूल व नाकबूल करतो, यावर चौकशीची दिशा निश्‍चित होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accounting of three Assistant Registrars; 58.30 lakhs abduction