गोळीबार करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नागपूर - मानेवाडा रिंगरोडवर असलेल्या ओंकारनगर येथील मटण शॉपच्या मालकावर दोन वर्षांपूर्वी गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना दोन वर्षानंतर यश आले. खुनासाठी नागपुरातील धर्मेंद्र वानखेडे याने सुपारी दिल्याचे तपासात समोर आले. 

नागपूर - मानेवाडा रिंगरोडवर असलेल्या ओंकारनगर येथील मटण शॉपच्या मालकावर दोन वर्षांपूर्वी गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना दोन वर्षानंतर यश आले. खुनासाठी नागपुरातील धर्मेंद्र वानखेडे याने सुपारी दिल्याचे तपासात समोर आले. 

मोहम्मद यासीन कुरेशी यांचे मानेवाडा रिंग रोडवरील ओंकारनगर परिसरात "अजमेरी' नावाने मटण शॉप आहे. कुरेशी यांच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी मोहम्मद यासीन दुचाकीने अभयनरातील द्वारकापुरी येथे राहणारा मित्र सागर मिश्रा याला भेटायला गेला. गाडी मित्राच्या घरासमोरील गेटसमोर पार्क करताच त्याच्या मागावर असलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात यासीनच्या उजव्या हाताला गोळी चाटून गेली होती. आवाज ऐकल्यानंतर समोरच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील कामगार बाहेर आल्याने दुचाकीवरील दोघेही पसार झाले. त्यापैकी मागच्याने लाल रंगाचा शर्ट घातल्याचे यासिनने सांगितले होते. गोळीबारानंतर यासीनने मित्राला फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. याच आधारावर ऍक्‍टिव्हा चालक सुरेंद्रकुमार रामपती यादव तर गोळी चालविणारा बच्चा मोर्य उर्फ नानुबाबू बच्चुलाल मोर्य (कुशवाह) (रा. कानपूर, उत्तरप्रदेश) यांची ओळख पटली. यापैकी सुरेंद्रकुमारने उच्च न्यायालयात वॉरंट रद्द करण्यासाठी प्रयत्नही केला होता. यानंतर शोध घेण्यासाठी पोलिसांनी उत्तर प्रदेश गाठले असता, त्यापैकी बच्चा मोर्य यादव 20 फेब्रुवारी 2017 रोजी अपघातात दगावल्याचे आढळले. सुरेंद्रकुमार उत्तरप्रदेशातील चार वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. बऱ्याच प्रयत्नानंतर 11 एप्रिलला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारणा केली असता, धर्मेंद्र मुकुंदराव वानखेडे (वय 34 रा. मंगलदीपनगर) याने त्याला कुरेशी यास मारण्यासाठी सुपारी दिल्याचे उघडकीस आले. 

वैमनस्यातून दिली सुपारी 
मोहम्मद यासीन कुरेशी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत. यातूनच धर्मेंद्र मुकुंदराव वानखेडे याचे त्याच्यासोबत शत्रूत्व होते. त्याचा काटा काढण्यासाठी धर्मेंद्रने दोन वर्षांपूर्वी सुरेंद्रकुमार यास सुपारी देत, मोहम्मद यासीनचा खून करण्यास सांगितले होते. त्यासाठी धर्मेंद्र वानखेडेने कुरेशीचे दुकान दाखविले. तसेच कामगिरीसाठी दुचाकी वाहन उपलब्ध करून दिले होते.

Web Title: accused arrested the accused