esakal | मूल्यांकन न करणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाहीचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मूल्यांकन न करणाऱ्या शिक्षकांवर कार्यवाहीचे संकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2019च्या परीक्षेत मूल्यांकनासाठी गैरहजर राहणाऱ्या पन्नास टक्‍के शिक्षकांवर कार्यवाहीचे संकेत असून, यासंदर्भातील फाइल कुलगुरूंच्या दालनात आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी 2019 च्या परीक्षा संपताच संबंधित त्या-त्या विषयाच्या तज्ज्ञ शिक्षकांना मूल्यांकनासाठी विद्यापीठाच्या मूल्यांकन केंद्रावर बोलविले होते. यासाठी विद्यापीठाने संबंधित शिक्षकांना लेखी पत्र, दोन-चारवेळा भ्रमणध्वनीवरूनसुद्धा कळविले होते. यानंतरही अशा 290 शिक्षकांनी मूल्यांकनाकडे पाठ फिरविली होती. ते सर्व जण अनुपस्थित होते. यामुळे परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या मुदतीच्या आत उन्हाळी परीक्षांचे निकाल देण्यास विलंब झाला. शिक्षकंनी मूल्यांकनाकडे पाठ फिरवू नये, म्हणून सर्व अनुपस्थित असलेल्या 290 शिक्षकांना नोटीस बजावून गैरहजर राहण्यासंदर्भात त्यांचा खुलासा मागितला होता.
विद्यापीठात संबंधित शिक्षकांनी आपले म्हणणे सादर केले आहे. यापैकी काही शिक्षकांनी वैद्यकीय कारणे दिलीत. वैद्यकीय कारणे देताना त्यासंदर्भातील पुरावे योग्य असल्यास ते ग्राह्य धरून यातून त्यांना क्‍लीन चिट देण्यात आली. परंतु, खोटी कारणे देणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसेच काही शिक्षकांनी यापूर्वी काही पेपर तपासले. परंतु त्यांना वेळेवर इतर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यास काही कारणांमुळे वेळ देता आला नाही. या वेळीसुद्धा त्यांनी दिलेली कारणे सयुक्‍तिक असल्यास त्यांनासुद्धा या कार्यवाहीतून क्‍लीन चिट मिळणार आहे. परंतु, 290 पैकी अंदाजे 145 शिक्षकांवर कारवाई करण्यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कारवाई करण्यासंदर्भातील फाइल कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे पाठविली आहे. या फाइलवर कुलगुरू चर्चा करणार असून, त्यावर कारवाईसंदर्भात पुढील निर्णय घेणार आहेत.

गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार
मूल्यांकनाकरिता अनुपस्थित राहणाऱ्या 290 शिक्षकांना नोटीस दिल्या होत्या. त्यावर त्यांच्याकडून उत्तर मागविण्यात आले आहे. ज्यांची कारणे योग्य असतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. इतरांवर मात्र कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय कुलगुरू घेणार आहेत.
डॉ. हेमंत देशमुख,

संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ अमरावती विद्यापीठ अमरावती.

loading image
go to top