शेतमालकाला सोडून शेतमजुरावरच कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

वर्धा - वीज चोरी करण्यासाठी खांब उभा करताना बालमजुराचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी शेतमालकाला सोडून खासगी वीजतंत्री आणि ट्रॅक्‍टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा प्रताप देवळी पोलिसांनी केला आहे. शेतमालकाचे दोन मेहुणे पोलिसांत असल्यानेच त्याला अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

वर्धा - वीज चोरी करण्यासाठी खांब उभा करताना बालमजुराचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी शेतमालकाला सोडून खासगी वीजतंत्री आणि ट्रॅक्‍टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा प्रताप देवळी पोलिसांनी केला आहे. शेतमालकाचे दोन मेहुणे पोलिसांत असल्यानेच त्याला अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

देवळी तालुक्‍यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकरी गौरव उद्धव वैद्य याने वीज महावितरणकडे कोणताही अर्ज न करता शेतात वीजखांब उभारणीचे काम सुरू केले होते. त्याकरिता त्याने गावात वीजजोडणीचे काम करणारे अमोल खेडकर व काही युवकांना बोलावले. यात बालकामगारांचाही समावेश होता. 11 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजतादरम्यान गौरव वैद्य याच्या शेतात वीजखांब उभारणीचे काम सुरू झाले. याकरिता खांबही चोरून आणल्याची माहिती आहे. शेतात खांब उभा करण्याकरिता वैद्य यांच्या ट्रॅक्‍टरचा उपयोग करण्यात आला. ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने खड्ड्यात खांब उभा करताना अचानक खांब बालमजूर आनंद शंकर तायवाडे याच्या अंगावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला सेवाग्राम रुग्णालय, तेथून नागपूरला हलविण्यात आले. मात्र, त्याचा 18 नोव्हेंबरला मृत्यू झाला. यादरम्यान खासगी वीजतंत्री अमोल खेडकर याने पूर्ण सहकार्य केले. उपचाराकरिता आर्थिक मदतही केली. या प्रकरणी आनंदच्या नातेवाइकांनी 21 नोव्हेंबरला देवळी पोलिसांत तक्रार नोंदविली व आनंदच्या मृत्यूस शेतकरी गौरव वैद्य व अमोल खेडकर हे जबाबदार असल्याचे त्यात नमूद केले. मात्र, पोलिसांनी खासगी वीजतंत्री अमोल खेडकर आणि ट्रॅक्‍टरचालक लक्ष्मण मांढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या सांगण्यावरून हे काम हाती घेण्यात आले, त्याला अभय दिले. या प्रकाराने मृताचे नातेवाईक हताश झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

महावितरणचेही हात वर
वीजचोरी प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करणाऱ्या महावितरणने या प्रकरणात हात वर केले आहे. वायगाव येथील कनिष्ठ अभियंत्यांचे मौन आश्‍चर्यचकित करणारे आहे. शेतकरी गौरव वैद्य याने कोणताही अर्ज न करता शेतात वीजखांब उभारून वीजचोरीचा प्रयत्न केला. यासाठी सिमेंट खांबही चोरून आणला. एवढेच नव्हे, तर तारांचीही जुळवाजुळव करून ठेवली होती. या घटनेविषयी सर्व माहिती उघड होऊनही महावितरणतर्फे कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात ठाणेदार मदने यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, खांब वीजजोडणीचा नव्हता. तो दुसऱ्या कामाकरिता उभा केला जात होता. या खांबांना तारा जोडलेल्या नसल्यामुळे वीजचोरीचा गुन्हा होऊ शकत नाही, असा दावा केला.

Web Title: action on Farm laborers