उपराजधानीत आठ महिन्यांत 84 हुक्‍का पार्लरवर कारवाई

मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

उपराजधानीत आठ महिन्यांत 84 हुक्‍का पार्लरवर कारवाई
नागपूर : युवा पिढीचे वाढते हुक्‍का पार्लरचे व्यसन लक्षात घेता नागपूर पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी शहरातील 84 पेक्षा जास्त हुक्‍का पार्लरवर छापे घालून कारवाई केली. या कारवाईत हुक्‍का पार्लर संचालक आणि व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

उपराजधानीत आठ महिन्यांत 84 हुक्‍का पार्लरवर कारवाई
नागपूर : युवा पिढीचे वाढते हुक्‍का पार्लरचे व्यसन लक्षात घेता नागपूर पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी शहरातील 84 पेक्षा जास्त हुक्‍का पार्लरवर छापे घालून कारवाई केली. या कारवाईत हुक्‍का पार्लर संचालक आणि व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
युवा पिढी नशेच्या आहारी जात असून युवकांसह शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या वाढत आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी अमली पदार्थ विरोधी पथक अलर्ट केले आहे. त्यामुळे शहरात ड्रग्ज पॅडलर, गांजा तस्कर आणि हुक्‍का पार्लरसाठी तंबाखू पुरवठादारांना टार्गेट केले आहे. गेल्या महिन्यात जवळपास 40 लाखांचे ड्रग्ज पोलिसांनी पकडले असून तीन आरोपींनाही अटक केली आहे. शिवाय गुन्हे शाखेलाही छापेमारी करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍तांनी दिले आहेत. सर्वाधिक छापे अंबाझरी आणि सीताबर्डी परिसरात केले आहेत. धरमपेठ आणि फुटाळा परिसरातील काही पार्लरमध्ये 15 ते 18 वयोगटांतील मुली आढळल्या आहेत. 84 छाप्यांपैकी 36 छापे अंबाझरी पोलिस ठाण्यातील हद्दीतील आहेत.
पालकांनो सावधान..!
हुक्‍क्‍याचे व्यसन मुलींमध्ये जास्त आहे. मुलीला जर हुक्‍क्‍याची किंवा अमली पदार्थ सेवनाचे व्यसन जडल्यास सुरुवातीला समुपदेशन त्यानंतर योग्य मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करता येतात. त्यानंतर व्यसन सोडविण्यासाठी औषधोपचारही घेता येतात. यासाठी पालकांनी सावध राहून पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हुक्‍का पिल्याने लैंगिक समस्या
युवा पिढी अमली पदार्थाच्या विळख्यात आहे. हुक्‍का पिल्याने लैंगिक समस्या निर्माण होतात. अनेक विवाहित जोडप्यांमध्ये वंध्यत्व आणि अन्य लैंगिक समस्या असल्याचे प्रमाण वाढत आहे. हुक्‍क्‍यात टॉक्‍झिक घटक असल्यामुळे पुरुषांच्या सिमेनवर परिणाम पडतो. शारीरिक संबंध आणि समाधानाबाबतही समस्या निर्माण होतात. लग्नापूर्वी हुक्‍का पिण्याची सवय असल्यास गर्भधारणेस विलंब होतो किंवा होणाऱ्या बाळामध्ये अपंगत्व येण्याची शक्‍यता असते.
- डॉ. सुषमा देशमुख, स्त्रीरोगतज्ज्ञ

आक्रमकतेतून शेवट नैराश्‍यात
जिज्ञासापोटी अनेक जण हुक्‍का पितात. परंतु सेवन करण्याची सवय लागल्यास व्यसनाधीन झाल्याचे समजावे. व्यसनाचे रूपांतर शारीरिक गरजेत आणि नंतर मानसिक आजारात होते. हुक्‍का किंवा अमली पदार्थ न मिळाल्यास चिडचिडेपणा होते. आक्रमकता वाढते. व्यसनपूर्ती न झाल्यास स्वमग्न राहण्यास सुरुवात करतो. अमली पदार्थ मिळवायचे कसे? कुठे मिळेल? कोण देईल? या विचारात तो नेहमी राहतो. खोटं बोलणे किंवा कोणत्याही स्तरावर जाण्याचे प्रकार समोर येतात. शेवटी अमली पदार्थाचा सेवनकर्ता नैराश्‍यात जातो.
-राजा आकाश, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action taken on 84 hukka parlors in eight months