esakal | 'त्या' गावात बाजार भरविणे भोवले; सात व्यावसायिकांवर झाली ही कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

weekly market.jpeg

आवार येथे कधीही बाजार भरत नसताना जमावबंदी कायदा लागू असताना 13 एप्रिल रोजी 7 ते 8 दुकाने लावून बाजार  भरविण्यात आला. ही बाब सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ क्लिप वरून समोर आली.

'त्या' गावात बाजार भरविणे भोवले; सात व्यावसायिकांवर झाली ही कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यातील आवार गावात 13 एप्रिल रोजी अनधिकृत दुकाने लावून जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 दुकानदाराविरुद्ध तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात सरपंच, पोलिस पाटील व सचिव यांनी तामगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून 14 एप्रिलचे रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउनमधील दुकान लावणेबाबतीत या तालुक्यातील पहिल्या गुन्हाची नोंद झाली आहे.

हकीकत अशी की, आवार येथे कधीही बाजार भरत नसताना जमावबंदी कायदा लागू असताना 13 एप्रिल रोजी 7 ते 8 दुकाने लावून बाजार  भरविण्यात आला. ही बाब सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ क्लिप वरून समोर आली. यामुळे प्रशासकीय स्तरावर खळबळ ही उडाली होती. म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी या बाबीची दखल घेत गटविकास अधिकारी चव्हाण यांना संदेश देऊन कार्यवाही करण्याची सूचना दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारकडून लॉकडाउन वाढविण्यात आले. 

आवश्यक वाचा - पोलिस असल्याची बतावणी करून केली मारहाण, मात्र तो निघाला...

गर्दी होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी आठवडी बाजार, बाजारपेठ (जीवनावश्यक सोडून) बंद केले आहेत. कलम 144 नुसार पाच व्यक्तीचेवर एकत्रित समूह नसावा असे असताना बाजार भरला. या संदर्भात जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांनी संग्रामपूर गटविकास अधिकारी यांना दूरध्वनीद्वारा कार्यवाही करण्याचा संदेश दिला होता. गावात समिती स्थापन असताना त्यात शासनाचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचा समावेश असताना ही बाजार कसा भरू दिला, हा विषयही प्रशासनासाठी विचार करायला लावणारा आहे. गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतला पत्र देऊन ज्या लोकांनी दुकाने लावली. 

त्यांचे विरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याबाबत सूचित केले होते. त्यावर आवार कोरोना जनजागृती व प्रतिबंधक उपाय योजना समितीचे सरपंच रंजना अवचार, पोलिस पाटील पुरुषोत्तम अवचार आणि ग्रामसेवक यांचे सहीनीशी 14 एप्रिलला तामगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार  पातुर्डा येथील सुभाष रोठे, अंबादास इंगळे, सुभाष सरावणे, आवार येथील प्रमोद बोदडे, आसिफ समद खा, निलेश अवचार, गोपाल अवचार अश्या सात दुकानदाराविरुद्ध तामगाव पोलिसांनी कलम 188 नुसार कार्यवाही करून गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

म्हणून व्हायरल झाला व्हिडीओ
गावातून प्राप्त माहिती नुसार, या गावातील एक व्यक्ती शेगाव येथे अडकून आहे. ती व्यक्ती आवार येथे आली असता समितीकडून गावात प्रवेश देण्यात आला नाही. सदर व्यक्तीला पुन्हा शेगाव जाणे भाग पडले. त्याच व्यक्तीचा भाऊ आवारमध्ये राहतो. गावात दुसरे गावातील लोक येऊन दुकाने लावू शकतात तर माझा भाऊ गावात का येऊ शकत नाही. यासाठी सदर व्यक्तीने व्हिडीओद्वारा प्रशासनाला माहिती देण्याची शक्कल लढविली गेल्याची परिसरात चर्चा आहे.

या अगोदर ही घडला होता प्रकार
या अगोदर 6 एप्रिल रोजी ही या गावात दुकाने सुरू करून गर्दी झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी समितीकडून सर्व दुकानदारांना सूचना देऊन हाकलून लावण्यात आले होते. हे खुद्द समिती कडून दिलेल्या फिर्याद मधेच नमूद आहे.

loading image