सरकारची दडपशाही, कोट्यधीशांच्या स्थलांतरणामुळे रुपयाचे अवमूल्यन : ऍड. आंबेडकर

File photo
File photo

नागपूर  : देशातील 75 हजार कोट्यधीश लोकांनी मालमत्ता विकून दुसऱ्या देशात कायमचे स्थलांतरण केले आहे. या लोकांनी जाताना विदेशी चलन (डॉलर) घेतले. यामुळे डॉलरची मागणी वाढली. रुपयाच्या अवमूल्यनासाठी हे प्रमुख कारण असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच ईडी, सीबीआय, एनआयए, आयटीसारख्या शासकीय संस्थांना हाताशी धरून सूड भावनेतून या लोकांवर कारवाईचे शस्त्र सरकारकडून उगारण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्ल्ड वेल्थ या दक्षिण आफ्रिकन संस्थेच्या अहवालाचा आधार घेत ऍड. आंबेडकर म्हणाले, की गेल्या तीन वर्षात भारतातील 75 हजार लोकांनी इतर देशात स्थलांतरण केले. या सर्व लोकांची मालमत्ता 10 कोटींच्यावर आहे. सरकारच्या विविध शासकीय संस्थांकडून चौकशी लावण्यात आली आहे. कारवाईच्या भीतीने त्यांनी देश सोडला. या सर्व लोकांनी देशातील त्यांची मालमत्ताही विकली. काही देशांत रुपयाचे चलन नाही. त्यामुळे या लोकांनी भारतीय चलनाचे डॉलरमध्ये रूपांतर केले. गेल्या तीन महिन्यात 19 बिलियन डॉलरचे चलन दुसऱ्या देशात गेले. देशात 399.44 बिलियन डॉलर आहेत. विदेशात जाणाऱ्यांचा अंदाज बघता येणाऱ्या काळात 500 बिलियन डॉलरची आवश्‍यकता देशाला असेल. रुपयाचे आणखी अवमूल्यन होईल. श्रीमंतांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारकडून एक प्रकारे त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत आहे.
परदेशातील लोक भारतात गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. याचा परिणामही रुपयावर होणार असून देशातील अर्थव्यवस्था डबघाईला येईल. 1990 पेक्षाही भयावर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. वर्ल्ड बॅंकेकडून मदत करताना पूर्वीपेक्षाही जाचक अटी लादण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी अशा सरकारला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्याची आवश्‍यक असल्याचे ऍड. आंबेडकर म्हणाले. यावेळी गुणवंत देवपारे, राजू लोखंडे, सागर डबरासे, ऍड. संदीप नंदेश्‍वर उपस्थित होते.

भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध
कुत्र्यांचा समूह वाघालाही पळवून लावू शकतो, असे वक्तव्य आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विदेशात केले. हे शब्द देशातील विरोधकांसाठी असल्याचे समजून त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. भागवत यांची मानसिकता यातून स्पष्ट होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध असून अशा मानसिकतेच्या लोकांना सत्तेतून घालविले पाहिजे, असे ऍड. आंबेडकर म्हणाले. या प्रकारच्या घटनांमुळेच सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातल्याचेही ते म्हणाले.
कामगार कायदा मोडीत काढण्यासाठी शहरी नक्षलवाद
देशातील कायदे कामगारांच्या हिताचे आहेत, असे स्पष्ट करून आंबेडकर म्हणाले, की गेल्या दशकात सत्तेवर असलेले लोक हा कायदा कमजोर करण्याच्या प्रयत्नात आहेत. कामगारांसाठी लढणाऱ्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळेच शहरी नक्षलवाद हा प्रकार सुरू करण्यात आला असून याला पोलिसांचाही पाठिंबा आहे.
एमआयएमशी युती
एमआयएमकडून पत्र मिळाले असून त्यांनी युती करून निवडणूक लढण्यासाठी तयार दर्शविली आहे. आमचीही तयारी आहे. कॉंग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव दिला असून त्यांच्या प्रतिसादाची वाट आहे. दलित शब्दाचा पाहिजे त्यांनी वापर करावा, असे आंबेडकर म्हणाले.
संघाचे आमंत्रण स्वीकारणार नाही
संघाने आमंत्रण दिले तरी ते स्वीकारणार नाही. त्यांची विचारसणी आणि आमची विचारसरणी परस्परविरोधी आहे. गोळवलकर गुरुजी आणि सरदार पटेल यांच्यात 1945 ला झालेल्या करारावर त्यांनी चर्चा करावी, असे ऍड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com