आधी डबा जोडा, नंतरच गाडी पुढे जाऊ देऊ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

- नागपूर स्थानकावर प्रवाशांचा गोंधळ
- वारंवार चेनपुलिंग
- महाराष्ट्र एक्‍स्प्रेस 40 मिनिटे खोळंबली
- एस-9 क्रमांकाचा डबा दिसत नसल्याने प्रवासी संतापले
- 11.20 वाजता गाडी पुढील प्रवासाला रवाना 

नागपूर : रेल्वेला एक डबा कमी जोडला गेल्याची ओरड करीत महाराष्ट्र एक्‍स्प्रेसच्या प्रवाशांनी चांगलाच गोंधळ घाला. गाडी सुरू होताच वारंवार चेनपुलिंग करून (साखळी ओढून) ती थांबविण्यात येत होती. या प्रकाराने ही गाडी सुमारे 40 मिनिटे नागपूर रेल्वेस्थानकावरच खोळंबली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बाबी समजावून सांगितल्यानंतर ती पुढे रवाना झाली. 
11040 गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्‍स्प्रेस सोमवारी गोंदियाहून कोल्हापूरकरिता निघाली. एरवी या गाडीला एस-9 क्रमांकाचा डबा जोडला जातो. त्यात सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांचे आरक्षण असते. तांत्रिक अडचणीमुळे गेले काही दिवस हा डबा जोडणे थांबविण्यात आले आहे. काही प्रवाशांना त्याबाबतची माहिती नव्हती. सोमवारी सकाळी 10.40 वाजता महाराष्ट्र एक्‍स्प्रेस नागपूरच्या फलाट क्रमांक 4 वर पोहोचताच प्रवाशांनी त्यांचे आरक्षण असणारे डबे शोधणे सुरू केले. एस-9 क्रमांकाचा डबा दिसत नसल्याने प्रवासी संतापले. त्यांनी आरडाओरड सुरू केला. गाडी सुटण्याची वेळ होताच प्रवाशांनी अन्य डब्यात चढून साखळी ओढून गाडी थांबविली. वारंवार गाडी थांबविण्यात येत असल्याने उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाचे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी फलाटावर धाव घेतली. 
त्यांनी प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवासी काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. आधी डबा जोडा, नंतरच गाडी पुढे जाऊ देऊ, असा पवित्रा त्यांनी घेतला. तांत्रिक बाबी समजावून सांगितल्यानंतर प्रवाशांचा रोष काहीसा शांत झाला. त्यानंतर 11.20 वाजता ही गाडी पुढील प्रवासाला रवाना झाली. गोंदियापासून जोडला जाणारा एस-9 क्रमांकाचा डबा सोलापूरच्या प्रवाशांचा असतो. महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला जोडून तो दौंडपर्यंत जातो. तिथून दुसऱ्या गाडीला जोडून सोलापूरला पोहोचतो. 20 नोव्हेंबरपर्यंत डबा जोडला जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने पूर्वीच जाहीर केले आहे. एसएमएस पाठवून यासंदर्भात प्रवाशांना कळविण्यातसुद्धा आले आहे. परंतु, दलालांकडून तिकीट घेणाऱ्यांपर्यंत याबाबत माहिती नसल्याने असे प्रकार घडत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Add the box first, then let the train go