वृक्षकटाईची सर्व माहिती वेबसाइटवर टाका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नागपूर : वृक्ष कटाई संदर्भातील सर्व माहिती (डाटा) वेबसाइटवर टाकण्यात यावी, असे आदेश नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मनपाला दिलेत. याप्रकरणी आता चार आठवडयानंतर सुनावणी होणार आहे.

नागपूर : वृक्ष कटाई संदर्भातील सर्व माहिती (डाटा) वेबसाइटवर टाकण्यात यावी, असे आदेश नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मनपाला दिलेत. याप्रकरणी आता चार आठवडयानंतर सुनावणी होणार आहे.
शहरात नवीन वृक्ष लावण्याकरिता जागा नाही. वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर मोठा वाईट परिणाम पडत आहे. त्यामुळे हायकोर्टाने गंभीर दखल घेत स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. "एक विद्यार्थी एक वृक्ष'चे संयोजक व सामाजिक कार्यकर्ते सुनील मिश्रा यांनी मध्यस्थी करून अनेक उणिवा काढून काही सूचना केल्या आहेत. याप्रकरणी न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मिश्रा यांनी सांगितले, शहरात किती वृक्षकटाई केली जात आहे. यासंदर्भातील माहिती सामान्य नागरिकांना नसते किंवा त्यांना माहिती होत नाही. केवळ एखाद्या वर्तमानपत्रात थोड्या मजकुरासह नोटीस दिली असते. त्यामुळे सामान्य जनतेला माहिती मिळत नाही. या कारणामुळे वृक्ष प्राधिकरण कुणाची हरकत नसल्यामुळे वृक्ष कटाईची अनुमती देऊन टाकतात. मनपाकडे वृक्ष कटाई करण्याकरिता जेवढे अर्ज आले आहेत. त्या सर्व अर्जांना मनपाच्या वेबसाइटवर टाकायला पाहिजे. तसेच कोणत्याही नागरिकाला अनुमतीपत्राची तपासणी करण्याचा हक्क राहील, असे मिश्रा यांनी हायकोर्टाला सांगितले. त्यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ नगर विकास विभागाने 2016 मध्ये जारी केलेल्या आदेशाचा दाखला दिला. त्यावर आजतागायत मनपाने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे वृक्ष कटाईच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हायकोर्टाने मनपाला आदेश दिले की, वृक्ष कटाईची सर्व माहिती वेबसाइटवर टाकावी. तसेच कुण्याही नागरिकाला वृक्षकटाईच्या अनुमती पत्राची तपासणी करू द्यावी, असे आदेश दिलेत. सुनील मिश्रा यांनी आपली बाजू स्वत: मांडली. कोर्ट मित्र ऍड. कल्याणी देशपांडे, मनपातर्फे जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Add information about tree to the website