वर्दी घालून तोतयाची "वसुली'

file photo
file photo

नागपूर : वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची वर्दी घालून भरदिवसा रस्त्यावर "वसुली' करताना तोतया पोलिस कर्मचारी दिलीप उद्धवराव टापरे (32, रा. गाडगेबाबानगर) याला लकडगंज पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी गंगा-जमुनासमोर केली. दिलीप हा मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील रहिवासी असून, रमना मारोती परिसरात मधुकर खलासने यांच्याकडे पत्नी व चार वर्षांच्या मुलीसह भाड्याने राहतो. शिक्षणासाठी तो सात वर्षांपूर्वी शहरात आला. त्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. बेरोजगार असलेल्या दिलीपने बाजारातून वाहतूक पोलिसाची वर्दी खरेदी केली. पोलिस असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून व गणवेश घालून रस्त्यावर फिरू लागला. सकाळी घरातून निघाल्यानंतर लकडगंज, नंदनवन, कळमना येथील रस्त्यांवर उभा राहून तो वाहनचालकांना अडवू लागला. वाहतूक नियम मोडण्याऱ्यांशी तडजोड करून मिळेल ते पैसे घेत होता. तो अडीच वर्षांपासून हा गोरखधंदा करीत होता. यातून त्याने लाखोंची माया जमवली असावी, असा संशय पोलिसांना आहे. पोलिस शिपाई रस्त्यावर एकटाच उभा राहून वाहनांवर कारवाई करीत असल्याचे समजल्यावर लकडगंज ठाण्याचे एएसआय बांदेकर यांना संशय आला. त्यांनी कर्मचाऱ्यांसह त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो बनावट पोलिस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या वसुलीपासून प्रेरणा
रोजगाराच्या शोधात असताना त्याला रस्त्यावर वाहतूक पोलिस वाहनचालकांकडून पैसे उकळताना दिसले. त्याने काही दिवस वाहतूक पोलिसांवर लक्ष ठेवून अभ्यास केला. वाहतूक पोलिसांकडून वसुली कशी करावी? याची प्रेरणा घेतली आणि थेट वर्दी घालून वसुली करायला सुरुवात केल्याची माहिती आहे.

अडीच वर्षांपासून कार्यरत
दिलीप टापरे हा अडीच वर्षांपासून पोलिसांप्रमाणेच बिनबोभाट वसुली करीत होता. त्याने वाहतूक पोलिसांचा चांगलाच अभ्यास केला होता. त्याने वाहनचालकाला लुबाडण्यासाठी कायद्यातील कलम आणि दंडाची रक्‍कम परफेक्‍ट सांगत होता. वाहतूक पोलिसांप्रमाणेच कमाईचा पट्टा सुरू असल्यामुळे खऱ्या पोलिसांनाही आतापर्यंत संशय आला नाही, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com