अप्पर जिल्हाधिकारी ‘रिव्हॉल्व्हर’ रोखतात तेव्हा...

श्रीधर ढगे
सोमवार, 20 जानेवारी 2020

बुलडाणा जिल्ह्यात अशा बऱ्याच घटना होत असून, काही महिन्यांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांच्या बंगल्यासमोर धुडगूस घालून नेमप्लेट तोडण्यात आली होती. रेती माफिया आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांत जिल्ह्यात जणू एक प्रकारचा संघर्ष पहावयास मिळत आहे.

खामगाव (जि.बुलडाणा) : अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी टिप्पर चालकावर रिव्हॉल्व्हर रोखून धरल्याची घटना नांदुरा येथे शनिवारी (ता.18) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे रेती वाहतूकदार आणि रेती माफिया यांना धडकी भरली आहे.

शेगाव तालुक्यातील जलंब येथे नुकताच मंडळ अधिकारी संजय देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात अशा बऱ्याच घटना होत असून, काही महिन्यांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांच्या बंगल्यासमोर धुडगूस घालून नेमप्लेट तोडण्यात आली होती. रेती माफिया आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांत जिल्ह्यात जणू एक प्रकारचा संघर्ष पहावयास मिळत आहे.

महत्त्वाची बातमी - हृदय विकाराला बनविली ताकत, अन् वेटलिफ्टींगमध्ये मिळविले नावलौकीक

Image may contain: 1 person
अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे

 

अप्पर जिल्हाधिकारी दुबेंची धडक कारवाई
अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी वाळू माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. अप्पर जिल्हाधिकारी दुबे स्वतः रेतीघाट, रेती वाहतुकीच्या मार्गावर अवैध रेतीसाठा असलेल्या ठिकाणी जात आहेत. अवैध रित्या, विना रॉयल्टी रेती वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत आहेत. नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव आणि शेगाव या परिसरात अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने दुबे यांनी आपला मोर्चा आता घाटाखाली वळवला आहे. 

हेही वाचा - मनुताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची मुंबईत विजयी पताका

टिप्पर चालकावर सिनेस्टाईल रिव्हॉल्वर रोखले
शनिवारी त्यांनी एका चालकाला नांदुरा रेल्वे गेट जवळ थांबवले. यावेळी चालक ऐकत नसल्याने अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी चक्क त्याच्यावर सिनेस्टाईल रिव्हॉल्वर रोखले. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला. दरम्यान, या वाहनात रेती ऐवजी गट्टू होते. त्यामुळे वाहन सोडून देण्यात आले. मात्र, या प्रकाराची चर्चा रेती वाहतूक धारकांमध्ये पसरली. दुबे यांच्या आक्रमक भूमिकेने वाळू माफिया मात्र धास्तीमध्ये आहेत.

Image may contain: sky and outdoor
रात्री दरम्यान अवैध रेती वाहतूक होत असल्याचे हे बोलके चित्र

 

चिरीमिरी वाढली
अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे हे रेती माफियांवर कारवाई करत असल्याने महसूल मधील काही अधिकारी व कर्मचारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. रेती वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर हप्ते घेऊन अवैध वाहतुकीला अभय दिल्या जात आहेत. तहसीलदारपासून मंडळ अधिकाऱ्यांपर्यंत साखळी निर्माण झाली असून, पोलिस आणि महसूल विभागात जणू चिरीमिरीची स्पर्धा सुरू आहे.

हप्‍तेखोरीचे बुलडाणा कनेक्‍शन
महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी रेती वाहतूकदारांकडून हप्‍ते घेत असून, या हप्‍तेखोरीचे कनेक्‍शन बुलडाणा जिल्‍हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असल्‍याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. खामगाव येथील रात्रीच्‍या अवैध रेती वाहतुकीची व्‍हिडीओसह तक्रार दिल्‍यावरही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. हप्‍तेखोरीचे महापाप झाकण्यासाठी वरिष्ठांकडून फक्‍त कारवाई फार्स केला जातो असाही आरोपी होत आहे. दरम्‍यान, या संदर्भात प्रतिक्रियेसाठी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांना संपर्क केला असता त्यांनी कॉल घेतला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: additional collector kept on revolver on tipper driver