आश्रमशाळांमध्ये सुविधांयुक्त "सीक रूम'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांमध्ये सर्व सुविधांयुक्त "सीक रूम' निर्माण करण्याचा निर्णय या विभागाने घेतला. त्याचा लाभ लाखो आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांमध्ये सर्व सुविधांयुक्त "सीक रूम' निर्माण करण्याचा निर्णय या विभागाने घेतला. त्याचा लाभ लाखो आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
राज्यात 502 शासकीय आश्रमशाळा असून, 1 लाख 91 हजार 729 विद्यार्थी शिकतात. तसेच 16 एकलव्य निवासी शाळा सुरू असून, त्यात 3 हजार 518 विद्यार्थी प्रवेशित आहेत. बहुतांश आश्रमशाळा या अतिदुर्गम भागात आहेत. आवश्‍यक तेव्हा वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे गरजेचे असते. आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अंतर अधिक असते. त्यामुळे आवश्‍यक तेव्हा आजारी, अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना उपचार मिळू शकत नाही. आश्रमशाळांमध्ये अशी व्यवस्था उपलब्ध करण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून सुरू होते. या "सीक रूम'मध्ये फर्निचर, औषधे, वैद्यकीय उपकरणे (प्रथमोपचार) आदी असणे आवश्‍यक आहे. औषधांची व्यवस्था दोनशे विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असली तरी, विद्यार्थी संख्येनुसार खरेदी संबंधित विभागाला करावी लागेल. आदिवासी उपाययोजनेच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काही औषधांची खरेदी केली जाते. आरोग्य विभागाकडून खरेदी केलेली औषधे वगळून उर्वरित औषधांचीच खरेदी या विभागाला करावी लागेल. त्यासाठी प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समितीचे गठण केल्या जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी (पुरवठा), लेखाधिकारी व शासकीय आश्रमशाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक या समितीत राहतील. सीक रूममध्ये व्यवस्थापन करताना औषधांचा अर्धा साठा कमी होण्याआधीच औषधांचे पुनर्भरण करून घेण्याची जबाबदारी आश्रमशाळांची असेल. औषधसाठा खराब होऊ नये, यासाठी आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध कराव्या लागेल.

Web Title: adivasi school news