यवतमाळमध्ये सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

administration has ordered to review damage crop in yavatmal
administration has ordered to review damage crop in yavatmal

यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीनसारख्या नगदी पिकाला ऐन परिपक्वतेच्या काळात पावसाने झोडपले. त्यामुळे हिरव्या शेंगामधून कोंब बाहेर पडताना दिसत आहेत, कपाशीची बोंडे काळवंडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्यासाठी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

अमरावती विभागीय आयुक्त पीयूष गोयल यांनी गुरुवारी(ता.24)पत्राद्वारे विभागातील पाचही जिल्ह्यांत जून ते सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टीमुळे नासाडी झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच शेतकऱ्यांना मदतीचे प्रस्ताव सादर करण्यास जिल्हा यंत्रणेला सांगितले आहे. या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तोंडाशी आलेले खरिपाचे पीक वाया जाणार, या भीतीने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली. कृषी अधिकाऱ्यांनी हिरव्या शेंगांमधून फुटलेले कोंब पाहून चिंता व्यक्त केली. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम दैनिक 'सकाळ'ने दिले होते. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी याची दखल घेत कृषी शास्त्रज्ञांच्या बैठकीत हिरव्या शेंगांमधून कोंब निघण्याच्या प्रकाराचे संशोधन व्हावे, अशी भूमिका मांडली. याची पालकमंत्री संजय राठोड यांनी दखल घेतली. त्यानुसार अमरावती विभागीय आयुक्तांनी नुकसानग्रस्त सोयाबीन व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

नुकसानग्रस्त सोयाबीन व अन्य पिकांचे पंचनामे करण्याचा विभागीय आयुक्तांचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. सोयाबीन शेंगातून कोंब निघण्याच्या प्रकार प्रथमच पाहायला मिळाला. यावर विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी संशोधन केल्यास शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची दिशा स्पष्ट होईल. हवामानबदलामुळे शेतमालाचे नुकसान झाले. त्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावा, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव म्हणाले.

सोयाबीनच्या शेंगा वरून हिरव्या वाटत असल्या तरी दाण्यांची परिपक्वता झाल्याने आर्द्रता व पोषक वातावरणामुळे कोंब निघालेले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली आहे. त्यामुळे शेंगांनी परिपक्वता गाठलेली आहे. शेतकऱ्यांनी यापुढे पेरणी करण्याची घाई करू नये. जनुकीय ऱ्हास झाल्याने जेएस-335 हे वाण यापुढे पेरू नये, शासनाने त्यावर बंदी आणावी. सद्यःस्थितीत भिजलेले सोयाबीन पीक शेतकऱ्यांनी मोकळे करावे, असे सहयोगी संशोधन मध्यविदर्भाचे संचालक डॉ. प्रमोद यादगीवार म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com