वारकऱ्यांच्‍या सुरक्षेबाबत प्रशासन उदासीन!

श्रीधर ढगे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- पालखी अपघाताच्‍या कटू घटनांमध्ये वाढ
- वारकऱ्यांचा जातोय हकनाक बळी
- शेगवा तालुक्यातील येऊलखेडमध्ये शोककळा

खामगाव (जि.बुलडाणा) : दिवे घाटातील दिंडी अपघातानंतर वारकऱ्यांच्‍या हकनाक जाणाऱ्या बळीबाबतचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा उपस्‍थित होत आहे. या घटनेने अलीकडच्‍या काही वर्षात झालेल्‍या पालखी, दिंडी व पदयात्रेतील अपघातांच्‍या कटू आठवणी मनाला चटका लावून जात आहेत. दरम्‍यान, विविध क्षेत्रांना जाणाऱ्या हजारो भाविकांच्‍या सुरक्षिततेबाबत गंभीर इशारा देणाऱ्या घटना असून प्रशासन मात्र या संदर्भात उदासीन असल्‍याने दिसून येते.

मंगळवारी सकाळी दिवे घाटातील वळणावर दिंडीत जेसीबी घुसून झालेल्‍या भीषण अपघातात संत नामदेव महाराजांचे तेरावे वंशज सोपान महाराज व अतुल महादेव आळशी यांचा मृत्‍यू झाला. पंधरा वारकरी गंभीर झाले आहेत. या घटनेमुळे राज्‍यातील वारकरी सांप्रदयामध्ये शोककळा पसरली आहे. यासोबतच दिंडीमध्ये होणाऱ्या अपघाताबाबत चिंता सुध्दा व्‍यक्‍त होतांना दिसत आहे. ही अपघाताची घटना ही वरकरणी नेहमीप्रमाणे होणाऱ्या रस्‍ते अपघातासारखी असली तरी या घटनेच्‍या निमित्‍ताने पदयात्रा, दिंडी व पालखी सोहळ्यांमध्ये पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्‍या सुरक्षितेबाबतचा प्रश्‍न किती गंभीरतेने घेतला पाहिजे हे पुन्‍हा एकदा दिसून आले आहे.

Image may contain: sky and outdoor

वारकरीही असुरक्षीत?
महाराष्ट्र ही संतांची भुमि म्‍हणून ओळखल्‍या जाते. दरवर्षी आषाढी, कार्तिकी एकादशी, गुरुपोर्णिमा, श्रीराम नवमी, श्रींचे प्रगटदिन या उत्‍सवांसाठी राज्‍यातील पंढरपुर, शिर्डी, आळंदी, शेगाव या महत्‍वाच्‍या तिर्थक्षेत्राची पायी वारी अनेक दिंड्या व हजारो वारकरी करीत असतात. त्‍यामुळे नेहमी होणाऱ्या दिंडीतील अपघाताच्‍या घटना वारकऱ्यांसाठी चिंतेचा विषय तर आहेतच मात्र प्रशासन वारकऱ्यांच्‍या सुरक्षेबाबत उदासीन असल्‍याचे यातून दिसून येते. ज्‍या मार्गावरुन पालख्या मार्गक्रमण करत असतील तशा मार्गावरील वाहतूक अन्‍य मार्गाने वळवणे, वन-वे करणे, संबंधित मार्गांवर पोलिसांची गस्‍त, भाविकांना स्‍वयंशिस्‍तीबाबत मार्गदर्शन व माहिती दिल्‍यास असे अपघात टळू शकतात. त्‍यामुळे महाराष्ट्राची वारी पंरपरा दुर्घटनेविना कशी अविरत सुरु राहिल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Image may contain: 1 person, text

येऊलखेडमध्ये शोककळा
मंगळवारी दिवे घाटात झालेल्‍या पालखी अपघातात अतुल महादेव आळशी हे वारकरी ठार झाले. ते शेगाव तालुक्‍यातील येऊलखेड गावचे रहिवासी आहेत. त्‍यांच्‍या निधनाची वार्ता कळताच येऊलखेड गावावर शोककळा पसरली. अतुल आळशी यांनी बारावीपर्यंत शिक्षण पुर्ण केल्‍यावर घोडेगाव व आळंदी येथे वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेतले. भजन, किर्तनात त्‍यांना जास्‍त रस होता. या दिवाळीला ते गावी आले आणि परत पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले असता काळाने त्‍यांच्‍यावर झडप घातली. त्‍यांच्‍या पश्‍चात आई-वडील, तीन बहीणी असा आप्‍त परिवार आहे. त्‍यांच्‍याकडे दिड एक्‍कर शेती असून वडील भाजीपाला विक्रीचा व्‍यवसाय करतात.

पालखी अपघाताच्‍या दुर्देवी घटना
राज्‍यात पालखी अपघाताच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत. अलीकडच्‍या काही वर्षातील घटना आजही डोळ्यासमोर आल्‍या की अंगाचा थरकाप उडल्‍यावाचुन राहत नाही. यामध्ये 25 जुलै 2011 रोजी शेगाव येथील पालखी पंढरपुर येथून परत येत असतांना अंबड तालुक्‍यातील पारनेर ट्रकने धडक दिल्‍याने चौदा वारकऱ्यांचा चिरडून मृत्‍यू झाला होता. तर अनेक वारकरी जखमी झाले होते. त्‍यानंतर मुंबईहुन साईबाबांच्‍या दर्शनाला येणाऱ्या दिंडीला 11 डिसेंबर 2017 रोजी ईगतपुरी येथील भाविकाचा मृत्‍यू झाला होता. 5 फेब्रुवारी 2018 रोजी शेगावला पायी येणाऱ्या वाशिम जिल्‍ह्‍यातील उमरा कापसे गावातील दिंडीला अकोल्‍यानजिक पातुर बाळापुर रस्‍त्‍यावर बाग फाट्याजवळ ॲपेरिक्षाला अपघात होवून चार वारकऱ्यांचा मृत्‍यू झाला होता. वारकरी व भक्‍तांच्‍या वाहन अपघातात तर शेकडो बळी गेलेले आहेत. या घटनांमधून भाविक, वारकऱ्यांचे हकनाक बळी जात असल्‍याने चिंता व्‍यक्‍त होतांना दिसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: administration is indifferent to the security of the warkari