मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते!

रवी कुंभारे
गुरुवार, 11 मे 2017

आजूबाजूला नजर फिरविल्यास आपण खरेच मोक्षधाममध्ये आलो आहे की वीटभट्टींवर हेच कळायला मार्ग नाही. मोक्षधामवरील असेच चित्र अविरत सुरू राहिले तर येथे मृतदेहावर अग्निसंस्कार करायला ही जागा उरणार नाही

गुमगाव - जीवन हे सुख-दुःखाने भरलेले आहे. कधी ऊन तर कधी सावली, याप्रमाणे सुख आणि दुःख मानवी जीवनात येत असतात. कधी सुखाचे तर कधी दुःखाचे पारडे जड असते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळतो. मृत्यूनंतरचे सगळे सोपस्कार स्मशानभूमीवर पार पडत असतात. परंतु, गुमगावच्या स्मशानभूमीमध्ये प्रवेश करताच अनेक समस्यांचे रडगाणे सुरू होते.
गावातील मोक्षधाममध्ये काही वर्षाआधी भगवान शंकराची मूर्ती बसविण्यात आली. मूर्तीसमोर वेगवेगळ्या फुलांची झाडे लावून सौंदर्यीकरण करण्यात आले होते. दुःख वाटल्याने कमी होते आणि आनंद वाटल्याने वाढतो, असे म्हटल्या जाते. परंतु, येथील मोक्षधामची आजची स्थिती बघितल्यावर दुःखात असलेली व्यक्ती पुन्हा जास्त दुःखात बुडून जाते.

आजूबाजूला नजर फिरविल्यास आपण खरेच मोक्षधाममध्ये आलो आहे की वीटभट्टींवर हेच कळायला मार्ग नाही. मोक्षधामच्या जागेवर वीटभट्ट्या आहेत की वीटभट्ट्यांच्या जागेवर मोक्षधाम असे वेगवेगळे प्रश्‍न डोक्‍यात थैमान घालतात. मोक्षधामवरील असेच चित्र अविरत सुरू राहिले तर येथे मृतदेहावर अग्निसंस्कार करायला ही जागा उरणार नाही.

काही वर्षाआधी परिसरामध्ये लावण्यात आलेली फुलांची झाडे आता एकही शोधून सापडत नाही. वृक्षारोपणाची गावात थट्टा सुरू केली आहे की काय, असा प्रश्‍न पडायला लागतो. मोक्षधाममध्ये असलेले निवारेसुद्धा मोडकळीस आलेली आहेत. या ठिकाणची स्वच्छता कधी केल्या जात असेल काय, याची शंका येते. सगळीकडे अस्वच्छतेचे वातावरण दिसून येते. पावसाळ्यात तर येथील परिसर कसा राहत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यामुळे परिसरामध्ये खरंच अतिक्रमण केल्या जात आहे की अतिक्रमण असेल तर येथे कोणाचे "अर्थ'पूर्ण संरक्षण मिळत आहे .याची चौकशी प्रशासनाने करणे आज गरजेचे झाले आहे. त्यामुळेच भविष्यामध्ये मोक्षधामचे अस्तित्व ठिकवून ठेवता येईल.

प्रशासनाने हे करावे
सौंदर्यीकरण करून बसण्याची उत्तम व्यवस्था करावी.
दररोज येथील परिसर झाडून स्वच्छ करावा.
दुःख कमी करणारे सुविचार फलक परिसरामध्ये लावावेत.
रात्रीच्या वेळेस विजेची तसेच प्रकाशाची व्यवस्था राहील याकडे लक्ष द्यावे.

Web Title: administrative negligance in gumgaon